शासकीय महिला आश्रमातून दोन युवतींचे पलायन
By admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:37+5:302016-08-26T06:54:37+5:30
शहरातील रेणुका माता शासकीय महिला आश्रमातून दोन तरुणी पळून गेल्याची घटना रात्री उघडकीस आली.
अमित सोमवंशी/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 26 - शहरातील रेणुका माता शासकीय महिला आश्रमातून दोन तरुणी पळून गेल्याची घटना रात्री उघडकीस आली. त्याबाबत आश्रमाच्या अधीक्षिका पठाण यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळशिरस येथे नातेपुते रस्त्यावरील शिवतेज लॉजवर पोलिसांनी १८ आॅगस्ट रोजी धाड टाकून सहा जणांना अटक केली होती. त्यामध्ये कोलकाता येथील दोघा मुलींचा सहभाग होता. त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय रेणुका माता महिलाश्रमात पाठविण्यात आले होते.
काही दिवस त्या येथील वसतिगृहात राहिल्या; मात्र चार ते पाच दिवसात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हाती तुरी देऊन वसतिगृहातून धूम ठोकली. ही बाब अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या उशिरा लक्षात आली. त्यांनी आसपास शोधाशोध केली; मात्र त्यांचा पत्ता लागला नाही त्यामुळे अखेर अधिक्षिका पठाण यांनी गुरुवारी सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
असुरक्षित महिलाश्रम
महिलाश्रमामध्ये ना पुरेसे कर्मचारी आहेत ना सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे एक-दोन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून धूम पळून जाण्याची घटना यापूर्वीही अनेकदा घडली आहे. खोल्यांचे मोडके दरवाजे आणि तुटके तारेचे कुंपण यामुळे येथून पळून जाणे मुलींना अजिबात कठीण नाही.