सांस्कृतिक विभाग स्थापन करा
By admin | Published: July 18, 2016 03:29 AM2016-07-18T03:29:22+5:302016-07-18T03:29:22+5:30
फुले कलामंदिर व आचार्य अत्रे रंगमंदिर या नाट्यगृहांत भेडसावणाऱ्या गैरसोयींबाबत नाट्यकर्मींनी गुरुवारी महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेतली.
कल्याण : केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर व आचार्य अत्रे रंगमंदिर या नाट्यगृहांत भेडसावणाऱ्या गैरसोयींबाबत नाट्यकर्मींनी गुरुवारी महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक विभाग स्थापन करा, या प्रमुख मागणीसह नाट्यकर्मींना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीला नाट्यकर्मींसह दिग्दर्शक विजू माने व अभिनेते कुशल बद्रिके उपस्थित होते. नाट्यकर्मींच्या मागणीनुसार ठाण्याच्या धर्तीवर यंदाच्या वर्षात केडीएमसीतर्फे बालमहोत्सव भरवण्यात येईल, अशी घोषणाही देवळेकर यांनी यावेळी केली. कल्याणची ऐतिहासिक शहर, तर डोंबिवलीची सांस्कृतिक नगरी, अशी ओळख आहे. परंतु, महापालिकेत सांस्कृतिक विभागच नसल्याने याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. मनपा नाट्यगृहांत नाटकाच्या प्रात्यक्षिकांकरिता सवलत द्यावी, डोंबिवलीच्या नामदेव पथावरील परांजपे हॉल उपलब्ध करून द्यावा, शहरात नाट्य परिषदेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देऊन प्रायोगिक नाटकांसाठी मदत उपलब्ध करून द्यावी, सांस्कृतिक विभागासाठी सभापती नियुक्त करावा, मिनी थिएटर बांधून द्यावे, अत्रे रंगमंदिरातील डॉर्मिटरी अथवा कॅन्टीनची जागा सरावासाठी द्यावी, महापालिकेच्या शाळा सुटीच्या दिवशी तसेच शाळा सुटल्यानंतर विनामूल्य प्रात्यक्षिकांकरिता द्याव्यात, प्रायोगिक नाटकांसाठी भाड्यात ५० टक्के सवलत मिळावी, राज्य नाट्य स्पर्धेसाठी रंगीत तालमीसाठी नाट्यगृहातील एक सत्र मोफत द्यावे, परिवहन सेवा सावित्रीबाई नाट्यगृहाकडून वळवावी, डोंबिवली स्थानक परिसरातील जीर्णावस्थेतील तिकीट काउंटर दुरुस्त करावे आदी विविध बाबींकडे यावेळी लक्ष वेधले.
यावेळी अखिल भारतीय नाट्यपरिषद डोंबिवली विभागाचे दिलीप गुजर, आनंद म्हसवेकर, दीपाली काळे, धनंजय चाळके, शिवाजी शिंदे, सुरेश पवार, मेघन गुप्ते, प्रमोद पवार, भारती ताम्हणकर, राम दौंड, अशोक हंडोरे, अभिजित झुंजारराव आदी नाट्यकर्मींसह केडीएमसीचे सभागृहनेते राजेश मोरे, स्थायी सभापती संदीप गायकर, शिवसेना कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आदी उपस्थित होते.
अत्रे रंगमंदिराची पाहणी : या बैठकीनंतर खा. डॉ. शिंदे यांनी आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहणी केली. त्यात रंगमंदिरातील बरीच मोकळी जागा असल्याचे निदर्शनास आले. पहिल्या मजल्यावरील दोन्ही डॉर्मिटरीज वापराविना पडून आहेत. तेथे १५० आसन क्षमतेचे मिनी थिएटर आणि तालीम हॉल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजूकडील कॉन्फ रन्स हॉलचाही वापर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या जागेत डॉर्मिटरीचे स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले. भूमिगत वाहनतळाच्या सुरुवातीला उपाहारगृहाचे स्वयंपाकघर आणि स्टोअर रूम आहे. ते बंद करून तेथील जागा प्रायोगिक आणि बालरंगभूमीसाठी तालमींना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाडेनिश्चितीसाठी समिती
तालमींसाठी व प्रयोगासाठी भाड्यात सवलत देण्याचा मुद्दा नाट्यकर्मींनी मांडल्यानंतर महापौर देवळेकर यांनी भाडेनिश्चितीसाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. या समितीत रंगकर्मींच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.