नवी मंदिर समिती 30 जूनपूर्वी स्थापन करा !- न्यायालय
By Admin | Published: May 2, 2017 06:24 PM2017-05-02T18:24:48+5:302017-05-02T18:24:48+5:30
पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी 30 जूनच्या आधी नवी मंदिर समिती स्थापन करा
ऑनलाइन लोकमत
मुंबई/सोलापूर, दि. 2 - पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी 30 जूनच्या आधी नवी मंदिर समिती स्थापन करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्या. अभय ओक आणि न्या. मेमन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सध्या मंदिराचा कारभार महसूल विभागातील प्रभारी अधिकारी बघत आहे.
लवकरच आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर होईल. या वारीच्या कालावधीत मंदिराचा कारभार योग्य प्रकारे हाताळला जावा म्हणून 30 जूनच्या आधीच मंदिर समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या 4 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात येतील. या सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊन नवी मंदिर समिती स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे.
सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या माणसांची सोय लावण्यासाठी मंदिर समित्यांचा उपयोग करून घेत असल्याचे आरोप झाल्यानंतर मंदिर समिती बरखास्त करून मंदिराचा कारभार प्रशासकाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय झाल्यापासून मंदिराचा कारभार महसूल विभागातील प्रभारी अधिकारी बघत आहे. मात्र वारी काळात मंदिरातील नियोजन योग्य प्रकारे व्हावे या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला नवी मंदिर समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.