राज्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना
By Admin | Published: May 31, 2016 06:28 AM2016-05-31T06:28:27+5:302016-05-31T06:28:27+5:30
विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
नम्रता फडणीस, पुणे
विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
मराठी विश्वकोशाच्या संकल्पित २३ खंडापैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत. या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
यानुसार मुंबई येथे १२ (आयसीटी आणि मराठी विज्ञान परिषद), पुणे ४ ( डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ-३ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर-१), जळगाव २, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर १, नाशिक १ अशा ठिकाणी २० ज्ञानमंडळे स्थापण्यासंबंधी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करार झाले आहेत. पुणे विद्यापीठ, एसएनडीटी, नांदेड विद्यापीठाशी ज्ञानमंडळ निर्मित करण्यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून योजनेसाठी ४ कोटी ५२ लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली आहे. विश्वकोशाच्या १ ते २० खंडामधील शब्दांची नव्याने नोंद यादी तयार करणे, नव्याने समाविष्ट करण्याच्या नोंदी, कालबाह्य नोंदी व अद्ययावत करावयाच्या नोंदी यांचा अहवाल तयार करणे तसेच विश्वकोशातील नोंदींच्या लेखनासाठी लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आणि तज्ज्ञांनी दिलेले नोंदींचे संदर्भ, त्यासंबंधीची चित्रे, आॅडियो-व्हिज्युअल यांची पडताळणी व संपादन करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत.