धरण सुरक्षेसाठी विभागीय स्तरावर समित्यांचे गठण
By admin | Published: August 7, 2014 10:05 PM2014-08-07T22:05:20+5:302014-08-08T00:31:59+5:30
मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत.
खामगाव: मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत. राज्यातील सहा विभागांमध्ये या समित्या राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने धरणांची पाहणी करून, काही त्रुटी आढळल्यास त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांची राहणार आहे.
धरणांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. पुण्यातील माळीण गावात अलिकडेच घडलेल्या दुर्घटनेने धरणांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागासह कोकण, पुणे, नाशिक आणि मराठवाडा या सहा विभागांमध्ये सुधारित समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. क्षेत्रिय मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेल्या या समितीमध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदींचा समावेश राहणार आहे. या समित्यांनी त्यांच्या विभागातील धरणांची वेळोवेळी पाहणी करून, धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे अपेक्षित राहणार आहे. धरणांचे बांधकाम, तेथील उपकरणांच्या आधारे मिळणारे अहवाल तसेच विविध स्तरावर असलेल्या त्रुटी तपासण्याचे काम समितीला करावे लागणार आहे. समितीला धरणांची पाहणी दोन टप्प्यांमध्ये करावी लागणार असून, सहा महिन्यातून एकदा समितीची बैठक आयोजित करणे बंधनकारक राहणार आहे.