गणपती बाप्पांची बसमध्ये स्थापना; रोज प्रवासी करतात बाप्पाची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:27 PM2017-08-31T13:27:30+5:302017-08-31T13:50:44+5:30
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाऱ्या एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
परतवाडा, दि. 31- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाऱ्या एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. बसमधील प्रवासी श्रींची आरती करतात. सध्या ही बस या भागात चर्चेचा विषय ठरली आहे.
गणरायांची स्थापना घरोघरी, सार्वजनिक गणेश मंडळांत, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये होताना आपण बघितलं, पण परतवाडा येथील एका खासगी बसचालकाने गाडीतच गणेशाची स्थापना केल्याची ही पहिलीच वेळ असावी, असं मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
बसमधील चालकाच्या कॅबिनमधील बोनेटवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे मूर्ती त्याच ठिकाणी राहावी, यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. गणेशासाठी छोटे मंदिरही येथे तयार करण्यात आले आहे. ही बस दररोज सकाळी १० वाजता भैसदेही येथे पोहोचते. तेव्हा येथील जयस्वाल पेट्रोल पंपावर बाप्पाची आरती केली जाते. सायंकाळची आरती परतवाडा येथे केली जाते. यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना प्रसादाचे वितरण केलं जाते. बसमध्ये चढणारे व उतरणारे सर्व प्रवासी बाप्पांचं दर्शन घेतात.
सध्या ही बस परतवाडा, भैसदेही, बैतूल मार्गावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मार्गावरील लहान मोठ्या गावांतील प्रवासी व नागरिक ही बस पाहण्यासाठी येत आहेत. चालक बाबू यादव व वाहक आशिष कनाठे हे बाप्पांच्या प्रसादाची सोय आपल्या पैशातून करतात.
ही बस आमचे एकप्रकारे घरच आहे. त्यामुळे आम्ही यात गणेशाची स्थापना केली आहे. प्रत्येक प्रवासी कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतो. श्रीगणेशाला पाहून त्याचा थोडा ताण कमी व्हावा, हादेखील एक हेतू आहे, असं आशिष कनाठे म्हणाले आहेत.