स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना
By Admin | Published: June 11, 2017 06:36 PM2017-06-11T18:36:28+5:302017-06-11T18:36:28+5:30
आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11 - मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन ५७ वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली.
स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी रविवारच्या मुहूर्तावर एका बैठकीत बीजरोपण करण्यात आले. यावेळी चंद्रभान पारखे, द्वारकाभाऊ पार्थीकर, प्रा.बाबा उगले, प्रा.एस.ए.सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जे.के.जाधव यांनी सांगितले की, मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी आम्ही दोन पातळीवर लढा देणार आहोत. यात अभ्यासगटासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करुन विविध पुस्तके, लेख प्रकाशित करणे व माहितीपत्रीका प्रकाशित करुन जनजागृती करणे व शासनाला अहवाल देणे दुसरे ठोस कृतीकार्यक्रमाद्वारे चळवळ उभी करणे, आंदोलन, मोर्चा, धरणे करण्यात येतील. यासंदर्भात १८ रोजी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. २० रोजी विभागीय आयुक्ताना निवेदन देण्यात येईल व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर अगोदरचे तीन दिवस चक्री उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. या दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडावादी लोकांच्या बैठकाघेऊन जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहे. प्रा.उगले म्हणाले की, प्रा.उगले म्हणाले की, जगात ६० देश असे आहेत की, ते मराठवाड्यापेक्षा लहान आहेत. मराठवाड्यात ३०० लहान-मोठे पर्यटनस्थळ आहेत येथे अग्रीकल्चर हब होऊ शकते. स्वतंत्र मराठवाडा केल्यास आम्ही चांगला संसार करुन दाखवू. त्यासाठी आता भीक मागायची सवय सोडा, पुळचट वागणे सोडा, मागणीपूर्ण करण्यासाठी हाणामारी, तोडण्याशिवाय पर्याय नाही. द्वारकाभाऊ पार्थीकर यांनी सांगितले की, हौस म्हणून नाही तर अन्याय होतो म्हणून मराठवाडा स्वतंत्र पाहिजे ही आमची भूमिका आहे. डॉ.भगवानदास कापसे म्हणाले की, वेगळा झाल्यानंतर काय फायदे होतील, हे मराठवाड्यातील जनतेला पटवून द्यावे लागेल. तरच जनता या आंदोलनात उतरेल.
प्रा.एस.ए.सत्तार यांनी सूचना दिली की, एकामेकांना भेटल्यावर आपण ह्यजय मराठवाडाह्ण असे म्हटले पाहिजे. वर्षान्वर्ष विकास होत नसल्याने मराठवाड्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पंजाबराव वडजे म्हणाले. के.ई.हरिदास म्हणाले की, नागपूर करारा अंतर्गत विदर्भ व मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला जर विकास होत नसल्याने विदर्भ बाहेर पडत असेल तर मराठवाडानेही स्वतंत्र राज्याची मागणी करणे योग्य आहे. विकासासाठी अभ्यास गट स्थापन करुन काही होत नाही. मराठवाड्याचे वेगळे राज्य हीच मागणी आता धरून लढले पाहिजे, असा सल्ला श्रीकात उमरीकर यांनी दिला. यावेळी ओमप्रकाश वर्मा,सुनिल ठाकरे,डी.एस.बनकर,जी.एस.गायकवाड, प्रा.प्रशांत अवचरमल, एन.टी.जोशी,रमेश चव्हाण,रंगनाथ शेजवळ, प्रा.भागवत जमादार,चंद्रकांत भराड आदींची उपस्थिती होती.
२ लाख ३० हजार कोटीचा अनुशेष
गं.आ.नागरे यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊ पोहोचला आहे. यात सिंचन ५५ हजार कोटी, रस्ते ३९०० कोटी, उद्योग १२५००० कोटी, कृषी २५००० कोटी, कृषी प्रक्रिया उद्योग १०००० कोटी, सहकार १३०० कोटी, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण १हजार कोटी,शिक्षण १ हजार कोटी,वीज ७४१९ कोटी, पर्यटन १ हजार कोटींचा अनुशेष निर्माण झाला असून अशाने विभागाविभागात समतोल कसा साधणार असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.
स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रिमंडळ
प्राचार्य गायकवाड यांनी यावेळी स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रीमंडळही जाहीर करून टाकले. यात मुख्यमंत्री द्वारकाभाऊ पार्थीकर तर अर्थमंत्री म्हणून जे.के.जाधव यांचा उल्लेख करताच हास्य पिकले.