दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम' फांऊडेशनची स्थापना
By admin | Published: September 15, 2015 03:47 PM2015-09-15T15:47:42+5:302015-09-16T11:57:55+5:30
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना केली असून त्याद्वारे एसबीआयच्या बँक अकाऊंटमध्ये थेट मदत जमा करता येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदत अभियानाला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी व त्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) नाना पाटेकर यांनी पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जाऊन या संस्थेची अधिकृत नोंदणी केली असून संस्थेला लगेचच स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाऊंट नंबर देण्यात आला आहे. '35226127148' हा करंट अकाऊंट नंबर असून 'SBIN0006319' हा IFSC कोड आहे तर 'SBINBB238' हा स्विफ्ट कोड ( swift code) आहे. संस्थेच्या नोंदणीनंतर हे क्रमांक मिळाले असून ज्या ज्या व्यक्तींना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांना आता 'नाम फाउंडेशनच्या' या अकाऊंटमध्ये थेट पैसे जमा करता येतील.
आमच्या या मदत अभियानाला फक्त राज्य वा देशभरातून नव्हे तर परदेशातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. जिथे जिथे आम्ही जात होतो तेथे लोक आमच्याकडे मदत सुपूर्त करत होते. मात्र त्या सर्व पैशांचा योग्य रितीने विनिमय व्हावा व सर्व गरजूंना ती मदत मिळावी यासाठी ती एका योग्य माध्यमाद्वारे पोचवणे गरजेचे होते. त्यामुळेच आम्ही 'नाम' या फाऊंडेशनची स्थापना केल्याचे नानांनी सांगितले. आता ज्यांना मदत करायची आहे त्यांनी संस्थेच्या याच अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत, आमच्या नावाने चालवण्यात येणा-या इतर कोणत्याही संस्था किंवा लोकांकडे पैसे देऊ नका असेही नाना यांनी स्पष्ट केले.
या माध्यमातून जमा होणारे पैशांपैकी काही पैसे प्रथम आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना देण्यात येतील. त्यात फक्त यावर्षी आत्महत्या केलेले नव्हे तर २०१४ व २०१३ सालच्या शेतक-यांच्या कुटुंबियांचाही समावेश असेल. आमच्या माध्यमातून शेतक-यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी ही आर्थिक मदत म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी या पैशातून दुष्काळी भागातील तरुणांना कायमस्वरुपी रोजगार देण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत, असेही नाना म्हणाले.