दिव्यांगांसाठी विशेष विद्यालय स्थापन करणार
By admin | Published: June 24, 2017 03:53 AM2017-06-24T03:53:26+5:302017-06-24T03:53:26+5:30
राज्यातील दिव्यांगाना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील दिव्यांगाना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी राज्यात मिशन ‘झीरो पेंडन्सी’ अभियान सुरू करणार आहे, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी सांगितले.
अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशदा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळे’चे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अंपग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश डिंगळे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, डॉ. समीर दलवाई, डॉ. अंजली जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, दिव्यांगांना सोईसुविधा मिळाव्यात, तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार आहे. दिव्यांगांसाठी असलेला ४ टक्के निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा, यासाठी तालुका स्तरापर्यंत समित्यांची स्थापना केली आहे. भविष्यात त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणखी विविध उपाय योजण्यात येणार आहेत, तसेच दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी राज्याचे दिव्यांग धोरण मसुद्यावर सूचना मागविण्यात आल्या असून, लवकरच तो जाहीर करण्यात येणार आहे.