राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

By Admin | Published: April 10, 2016 02:58 AM2016-04-10T02:58:50+5:302016-04-10T02:58:50+5:30

सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची

Establishment of State Reorganization Commission | राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

googlenewsNext

नागपूर : सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी येथे केले.
युगांतर शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘लहान राज्यांची संकल्पना व विकास’ या विषयावर मा. गो. वैद्य बोलत होते. राजकुमार तिरपुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. गो. वैद्य म्हणाले, लोकसंख्या व लोकांचे हित हे निकष ठरवून नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी. ही निर्मिती करीत असताना नवीन राज्याची लोकसंख्या कमाल ३ कोटी आणि किमान ५० लाख असावी, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु आयोग किंवा शासन त्यांना वाटते तसे निकष ते गृहीत धरू शकतात. (प्रतिनिधी)

राज यांनाही एक दिवस जायचे आहे
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाचा विरोध करताना मा. गो. वैद्य यांच्यावर टीका केली होती. वैद्य यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना जी भाषा येते, ते त्याच भाषेचा वापर करणार. मी म्हातारा झालो आहे, आज ना उद्या जाणारच आहे. प्रत्येकाला जायचेच आहे. त्यांनाही एक दिवस जायचे आहे, असे ते म्हणाले.
मी ९३ वर्षांचा आहे. आणखी ७ वर्षे जगण्याची माझी इच्छा आहे. कुणी पिस्तूल घेऊन माझ्यावर गोळी झाडली तर गोष्ट वेगळी, अन्यथा ७ वर्षांनी शतक साजरे करेन, असे वैद्य यांनी सांगितले.

संघाचे दायित्व माझ्याकडे नाही
मी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता होतो; पण आता नाही. त्यामुळे हे माझे व्यक्तिगत मत आहे. संघाशी त्याचा काहीही संबंध नाही. संघाने स्वतंत्र विदर्भाबाबत उघड भूमिका कधीही घेतली नाही. मात्र त्यांच्या संघटनात्मक रचनेत त्यांनी विदर्भ हे स्वतंत्र राज्य मानलेले आहे, असे मा. गो. वैद्य म्हणाले.

स्वतंत्र विदर्भाचे समर्थन
स्वतंत्र विदर्भ राज्य हे अपरिहार्य आहे. त्याचे मी समर्थन करतोच. परंतु मी जे वक्तव्य केले होते, ते केवळ विदर्भाशीच संबंधित नव्हते; तर एकूणच भारताच्या संबंधात होते. नवीन राज्याची निर्मिती ही लोकांची आवश्यकता, सुविधा व हिताचा विचार करून झाली पाहिजे. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये. परंतु आपल्याकडे आंदोलन केल्याशिवाय नवीन राज्याची निर्मितीच केली जात नाही, ही बाब चांगली नाही, असे त्यांनी सांगितले.
माझे निकष मान्य केले तर महाराष्ट्राची चार राज्ये होतील. एका भाषेची अनेक राज्ये झाली तर वाईट काय आहे, असा सवाल करून मा. गो. वैद्य म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर मराठी भाषेचे वा अस्मितेचे कुठलेही नुकसान होणार नाही.

Web Title: Establishment of State Reorganization Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.