कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना

By Admin | Published: October 25, 2016 03:02 AM2016-10-25T03:02:37+5:302016-10-25T03:02:37+5:30

बालविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून, कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पाच मंत्री आणि पाच सचिवांचा

Establishment of task force for eradicating malnutrition | कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना

कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना

googlenewsNext

मुंबई : बालविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून, कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पाच मंत्री आणि पाच सचिवांचा समावेश असलेला टास्क फोर्स स्थापन केला आहे, अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोमवारी येथे दिली.
युनिसेफतर्फे हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित करण्यात आलेल्या हवामानातील बदल, वाढते नागरीकरण या विषयावरील तीन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, सरकारने हे पाऊल उचलले आहे. कुपोषण निर्मूलनासाठी विविध विभागांच्या अनेक योजना आहेत, पण समन्वयाअभावी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर, या सर्व योजना एकाच छताखाली आणण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा यात समावेश आहे, शिवाय या विभागांचे सचिवही टास्क फोर्सचे सदस्य असतील.
राज्याची न्युट्रिशन पॉलिसी तयार करण्यात येत आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असतानाच, दुसरीकडे मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of task force for eradicating malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.