ईस्थर अनुह्याचा हत्यारा दोषी
By Admin | Published: October 28, 2015 02:35 AM2015-10-28T02:35:45+5:302015-10-28T02:35:45+5:30
सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने २९वर्षीय ड्रायव्हरला मंगळवारी दोषी ठरवले. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली
मुंबई : सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने २९वर्षीय ड्रायव्हरला मंगळवारी दोषी ठरवले. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी वकिलांनी ड्रायव्हर चंद्रभान सानप याच्यावरील आरोप सिद्ध केल्याने विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी सानपला दोषी ठरवले.
गोरेगाव येथील टीसीएस कंपनीत काम करणारी २३वर्षीय ईस्थर ५ जानेवारी रोजी गायब झाली. घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेलेली ईस्थर ५ जानेवारी रोजी पहाटे ४:५५ वाजता एलटीटी स्टेशनवर उतरली. मात्र ती गोरेगावला पोहोचलीच नाही. तिचा अर्धवट जळलेला मृतदेह कांजूरमार्ग येथील खारफुटीजवळ आढळला. १६ जानेवारी रोजी पोलिसांनी ईस्थरच्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप याला अटक केली.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सानपने ईस्थरने त्याच्या बाईकवर बसावे, यासाठी आधी तिचे मन वळवले. रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्याकडील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. तिने प्रतिकार केल्यानंतर सानपने तिचा गळा आवळला होता. (प्रतिनिधी)