विधानसभेत उमटणार ईटीसी केंद्राचे पडसाद
By Admin | Published: February 27, 2017 01:36 AM2017-02-27T01:36:27+5:302017-02-27T01:36:27+5:30
महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्राचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्राचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. केंद्र संचालिका यांच्या निवडीपासून ते लाभार्थ्यांच्या संख्येपर्यंत अनेक गोष्टींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या केंद्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आदर्श प्रकल्पांमध्ये ईटीसी केंद्राचा समावेश होतो. २००७मध्ये सुरू झालेल्या या केंद्राचा नावलौकिक देशभर झाला आहे; पण सद्य:स्थितीमध्ये कामकाज वादग्रस्त ठरू लागले आहे. लाभार्थ्यांचा आकडा पाच हजारांपेक्षा जास्त असल्याचे भासविले जात आहे; पण प्रत्यक्षात येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. वाढलेला आकडा हा फिजीओथेरपीसारख्या सुविधा व अपंगांसाठीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचा आहे.
पुढील वर्षासाठी तब्बल १६ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. दिव्यांग मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणावर खर्च करण्यासाठी पालिका सभागृहाने नेहमीच सढळ हाताने मदत केली आहे. या वर्षीही कोणीच विरोध करणार नाही; पण यापुढे ईटीसी केंद्रावर होणाऱ्या खर्चाचे सोशल आॅडिट करण्यात यावे. होणाऱ्या खर्चापैकी प्रत्यक्ष लाभार्थींवर किती खर्च झाला व प्रशासकीय कामांवर किती खर्च झाला हे पाहणे गरजेचे आहे. १० वर्षांमध्ये किती अपंगांचे पुनर्वसन केले हे तपासण्याची वेळ आली आहे. २०१३पासून फर्निचर खरेदीवर १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या चार वर्षांमध्ये गणवेश व इतर साहित्य खरेदीवर ३६ लाख रुपये खर्च झाले असून, आस्थापनेवर १० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हे आकडे व प्रत्यक्ष लाभार्थींवर झालेला खर्च या सर्वांचा मेळ साधण्याची मागणी होत आहे.
भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ईटीसी केंद्राच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. येथील विद्यार्थी संख्या, केंद्र संचालिकांची नियुक्ती, फर्निचर व इतर सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जवळपास वर्षभर पालिका आयुक्तांकडेही तक्रारी केल्यानंतरही काहीच उपयोग होत नसल्याने आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा घडविणार असल्याचा इशारा दिला आहे. आता ईटीसीचा वाद अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
>२०१२ - १३ ते
२०१६ - १७ मध्ये झालेल्या खर्चाचा तपशील
शीर्षक खर्च (लाख)
सकस आहार १७.७७
गणवेश व इतर साहित्य२०.२७
साहित्य, संशोधन४८.०३
परिवहन सेवा१८४.७६
केंद्राची देखभाल१६.७९
फर्निचर व साहित्य११८.४३
स्थापत्य कामे४५१.३६
आस्थापना खर्च१४३४.४४
वीज बिल २६.८
दिव्यांगांसाठी योजना२६५.२६
सामाजिक पुनर्वसन२६.५५
>आयुक्तांच्या भूमिकेवर शंका
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्या पदाला मंजुरी नसल्याने त्यांची पुन्हा आरोग्य विभागात रवानगी केली. इतर विभागातील मंजूर नसलेल्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही मूळ संवर्गात पाठविले होते. पण ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत यांच्या पदाला शासनाची मान्यता नसतानाही त्यांना मूळ संवर्गात पाठविलेले नाही.
>ईटीसी केंद्राच्या संचालिका यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या अनुभवाविषयी शंका आहे. ही नियुक्ती नियमबाह्य झाली आहे. याशिवाय केंद्राच्या कामकाजामध्ये अनेक त्रुटी असून, त्याची सखोल चौकशी करून दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाईची मागणी विधानसभेत करणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, भाजपा