वगैरे वगैरै... बेडवर बाई पाहून मंत्र्याला फुटला घाम, सुशीलकुमार शिंदेंच्या गौप्यस्फोटाने पिकला हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:58 PM2017-12-15T17:58:15+5:302017-12-15T18:01:27+5:30
देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात.
सोलापूर - देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात. नुकताच येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या.
पत्रकार संजय पाठक यांनी लिहिलेल्या फेटे आणि फटकारे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शिंदे यांनी हा किस्सा सांगितला. शिंदे म्हणाले. एक मंत्री जिल्हा दौऱ्यावर निघाले. त्यामुळे मंत्र्यांच्या पीएंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मंत्र्यांची व्यवस्था करण्यास सांगितले. या पीएंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात मंत्र्यांच्या आवडीचे जेवणाचे मेनू, झोपताना फळे आणि दुधाची व्यवस्था करा असे नमुद केले तसेच शेवटी वगैरे वगैरे असे लिहून पूर्ण विराम दिला. पण या वगैरे वगैरेचा जिल्हाधिकारी महोदयांनी मात्र भलताच अर्थ घेतला.
नियोजित वेळेत रात्री सदरहू मंत्री शासकीय विश्रामगृहाजवळ पोहोचले. तेथे गप्पा टप्पा झाल्यावर मंत्रिमहोदय झोपण्यासाठी बेडरूमकडे वळले. पण बेडवर पाहतात तर काय बेडवर एक बाई बसलेली. बाईला पाहून या मंत्र्यांना घाम फुटला. हा काय प्रकार म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तर कर्तव्यपरायण जिल्हाधिकारी म्हणाले, "तुमच्या मंत्र्यांनीच वगैरै वगैरेची व्यवस्था करायला सांगितले होते. फजिती झालेले हे मंत्रिमहोदय कोण होते. त्यांचा तो उपदव्यापी पीए कोण आणि अतिकर्तव्यपरायणता दाखवणारे ते जिल्हाधिकारी कोण याचा उल्लेख मात्र शिंदेंनी टाळला. मात्र त्यांनी सांगितलेल्या या मिश्किल किश्श्यामुळे संपूर्ण सभागृहाची हसून हसून पुरेवाट झाली.