इथेनॉल बसेसचे कंत्राटही सिटी लाइफलाइनला?
By Admin | Published: February 11, 2017 04:54 AM2017-02-11T04:54:22+5:302017-02-11T04:54:22+5:30
शहर बसेसचे कंत्राट सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्सला दिल्यानंतर आता ठाणे महापालिका याच कंपनीला १०० इथेनॉल बसेस विकत घेऊन चालवण्याचे नवे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे.
सोपान पांढरीपांडे , नागपूर
शहर बसेसचे कंत्राट सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्सला दिल्यानंतर आता ठाणे महापालिका याच कंपनीला १०० इथेनॉल बसेस विकत घेऊन चालवण्याचे नवे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे.
या दुसऱ्या कंत्राटातही निविदा प्रक्रियेत सिटी लाइफलाइन ही एकमेव कंपनी पात्र ठरावी यासाठी पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे मनपाने ही प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील बस आॅपरेटर्सकडून जोर धरत आहे.
‘लोकमत’जवळ असलेल्या कागदपत्रानुसार, इथेनॉलवर चालणाऱ्या १०० एसी बसेस खरेदी करून कंत्राटदाराला त्या ठाणे शहरात सिटी बसेस म्हणून देखभाल दुरुस्तीसह चालवायच्या आहेत. जवळपास १५ वर्षे मुदतीचे हे कंत्राट असून त्यासाठी कंत्राटदाराला १०० कोटी रुपये गुंतवावे लागतील. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती.११० टक्के भरपाई
या कंत्राटासाठी सिटी लाइफलाइनसह स्कॅनिया व बाफना मोटर्स, मुंबई या तीनच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या आहेत. यापैकी फक्त सिटी लाइफलाइनजवळ २०० सीएनजी बसेस चालवण्याचा अनुभव आहे, स्कॅनिया फक्त एक इथेनॉल बस चालवते तर बाफना मोटर्सजवळ बस चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे केवळ सिटी लाइफलाइन या निविदेसाठी पात्र ठरली आहे.
बदललेले पात्रता निकष
या निविदेसाठी पात्र ठरण्यासाठी कंत्राटदाराने अशाच प्रकारचे ७० कोटी रुपयांचे एक काम किंवा ५६ कोटींची दोन कामे किंवा ४२ कोटींची तीन कामे पूर्ण केलेली असावीत, असा निकष आहे. सिटी लाइफलाइन ही कंपनी दिल्लीमध्ये सीएनजी बसेस आधीच चालवत आहे. त्यामुळे या निकषांवर पात्र होणारी ती एकमेव कंत्राटदार ठरते.