वारणा कारखान्यात ऊस रसापासून थेट इथेनॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 06:29 PM2019-02-14T18:29:01+5:302019-02-14T18:32:02+5:30
चंद्रकांत कित्तुरे। कोल्हापूर : अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा ...
चंद्रकांत कित्तुरे।
कोल्हापूर : अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. असे करणारा तो देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. दररोज सुमारे ७० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन होत आहे.
देशातील अतिरिक्त साखरेवर उतारा म्हणून निर्यातीसह केंद्र सरकारने ज्या विविध उपाययोजना केल्या, त्यामध्ये उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या योजनेचाही समावेश आहे. यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पहिली पाच वर्षे कर्जावरील व्याज सवलत देण्यासाठी इथेनॉलचे दरही सरकारने वाढवून दिले आहेत. त्यानुसार सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४३ रुपये ४६ पैसे प्रतिलिटर, बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलला ५२ रुपये ४३ पैसे आणि उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती केल्यास ५९ रुपये १३ पैसे प्रतिलिटर असा दर निश्चित केला आहे. हे धोरण जाहीर झाल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारणी तसेच सध्या असलेल्या डिस्टिलरीत आवश्यक त्या सुधारणा करून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारने अशा ६१३९ कोटींच्या ११४ प्रस्तावांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे १३३२ कोटींचे व्याजअनुदान सरकार देणार आहे.
याचाच एक भाग म्हणून उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करून त्याचा पुरवठा करणाºया कारखान्यांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत या वर्षात एक कोटी पाच लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार करण्यात आले आहेत. यातील सर्वांत मोठा ७२ लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याचा करार वारणा साखर कारखान्याने केला आहे. यासाठी कारखान्याने सध्या असलेल्या डिस्टिलरीमध्ये काही सुधारणा करून उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यास २० डिसेंबरच्या आसपास सुरुवात केली. दररोज सुमारे ८०० टन उसापासून ७० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होत आहे. आतापर्यंत सुमारे ३० लाख लिटर उत्पादन झाले आहे. यातील सुमारे आठ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा पेट्रोलियम कंपन्यांना करण्यात आला आहे.
२३५ कोटी लिटरचे करार
देशात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. मात्र, केवळ ४ ते ५ टक्के इतकेच इथेनॉल मिसळले जाते. हे प्रमाण वाढावे यासाठी इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१५-१६ मध्ये १११ कोटी लिटर, २०१६-१७ मध्ये ६६.५ कोटी लिटर आणि २०१७-१८ मध्ये १५१ कोटी लिटर इथेनॉलचा वापर यासाठी करण्यात आला आहे. २०१८-१९ या वर्षात पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी २३५ कोटी लिटर इथनॉल पुरवठ्याचे करार झालेले आहेत.
अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करावे यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. असे करणारा वारणा देशातील पहिला कारखाना आहे. प्रतिलिटर ५९ रुपये दर मिळत असल्याने ही इथेनॉल निर्मिती फायदेशीरही आहे.
- विनय कोरे, माजी मंत्री,
वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष