नव्वदीतही ‘त्या’ गातात जात्यावरील ओव्या
By admin | Published: August 10, 2015 12:43 AM2015-08-10T00:43:26+5:302015-08-10T00:43:26+5:30
जात्याला ईश्वर मानून त्याच्या साक्षीने म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आजच्या यंत्र युगात नामशेष होत असताना एक, दोन नव्हेतर चारशे ओव्या मुखोद्गत करून अनसूयाबाई कंटुले यांनी
तुकाराम शिंदे, औरंगाबाद
जात्याला ईश्वर मानून त्याच्या साक्षीने म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आजच्या यंत्र युगात नामशेष होत असताना एक, दोन नव्हेतर चारशे ओव्या मुखोद्गत करून अनसूयाबाई कंटुले यांनी लोकवाङ्मयाची मौखिक परंपरा जपली आहे.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावच्या रहिवासी असलेल्या अनसूयाबाई यांचे वय ९० वर्ष आहे. काळाच्या ओघात लुप्त होणारा हा लोकसाहित्याचा खजिना त्यांनी जपला आहे. हे वाङ्मय जपले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
जन्म, बारसे, लग्न, डोहाळे जेवण, सुखीसंसार, सासर, माहेर, आई -वडील, भाऊ-भावजय, बहीण त्याचबरोबर परमेश्वर, गुरू, आत्मा, परमात्मा, पंढरपूर, विठ्ठल, राम-कृष्ण यांसह अशा अनेक विषयांवरील ओवी वाङ्मयाचा ठेवा त्यांच्याजवळ आहे.
आई व वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हा ठेवा मिळाल्याचे त्या सांगतात.
सकाळी उठोनी
हात तुळशीला जोडीते
देवाच्या पूजेला
ओल्या मंजुळा तोडीते
या ओव्यांद्वारे देवपूजेचे महत्त्व समजावून सांगितल्याचे त्या म्हणतात.
पंढरीला जाया, नव्हतं माझं मन
हरीने चिठ्ठ्या, पाठविल्या दोन
वृद्ध अवस्थेमुळे आषाढी यात्रेनिमित्ताने मला पंढरपूरला जाण्याची इच्छा नव्हती. पण तू यात्रेला ये, असे म्हणून सावळ्या विठ्ठलाने मला दोन चिठ्ठ्या पाठवून दर्शनाचे निमंत्रण दिल्याचा दाखला या ओवीद्वारे मिळतो, असे त्यांनी सांगितले.
आताचा जमाना,
युग निघालयं खोटं
जेवता भावजया
नंदा उचलती ताटं
आजच्या स्थितीचा दाखला अनसूयाबाई या ओवीद्वारे देतात.
तुकाराम म्हणे
जिजे माझ्यासंग चल
मागे राहिल्याने
बहू होतील तुझे हाल
जिजाऊ तू माझ्या सोबत चल. माझ्या पश्चात तुझे खूप हाल होतील, असे संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितले होते, असेही अनसूयाबाई म्हणतात. वारकरी संप्रदायात आयुष्य व्यतीत केलेल्या अनसूयाबाई पंधरवाडी एकादशी करतात. त्यांचा मुलगा प्रा. गणेश कंटुले यांनी ओवी वाङ्मयाचे संकलन केले आहे.