२०० वर्षांनंतरही मराठी बोलींचा हेल-ढंग जसाचा तसा ऐकता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:51 AM2024-02-27T08:51:03+5:302024-02-27T08:51:31+5:30
मराठी भाषा गौरव दिनविशेष; दृकश्राव्य माध्यमात एका क्लिकवर उपलब्ध
- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते, त्यामुळे या बदलणाऱ्या भाषा आणि बोलींना टिपण्याचे काम नुकतेच राज्य मराठी विकास संस्थेने पूर्ण केले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आता या मराठी बोलींच्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशनासाठी सज्ज आहे, या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीच्या बोलींचे डिजिटल रूपात जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने पुढील कित्येक पिढ्या मराठीच्या बोलींचा गोडवा १००- २०० वर्षांनंतरही त्यांच्या सौंदर्यासह हेल, ढंग स्वरूपात जशाच्या तसा ऐकू, पाहू शकणार आहेत.
मुंबईतील राज्य मराठी विकास संस्थेने आणि पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठासह संयुक्त विद्यमाने २०१७ पासून हा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत मराठी बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासोबतच बोलींचे प्रतिमांकन म्हणजे डिजिटायझेशन तसेच बोलींतल्या निवडक शब्दांचे आणि वाक्यस्तरावरील काही विशेषांचे.
नकाशांच्या स्वरूपात आलेखन अर्थात मॅपिंग करण्यात आले आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीत राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांतील २७७ गावांमधील एकूण अंदाजे २,९६२ व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वेक्षणात मुंबई शहर, जिल्हा आणि मुंबई उपनगर या शहरी जिल्ह्यांचा समावेश केलेला नाही. राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेल्या https://sdml.ac.in/mr या संकेतस्थळावर भाषा अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना हा बोली विशेषांचा संमातर संग्रह उपलब्ध होणार आहे. हा संग्रह दृकश्राव्य स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध आहे, हे संकेतस्थळ मराठी व इंग्लिश अशा दोन्हीही भाषांमधून उपलब्ध असणार आहे. ही सर्व माहितीची सामग्री मुक्तस्रोत परवान्याअंतर्गत सर्वांना उपलब्ध आहे. राज्य मराठी विकास संस्थेने केलेल्या सर्वेक्षणापूर्वी सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट हा अभ्यास डॉ. अमृतराव घाटगे यांनी केला होता. त्यापूर्वी डॉ. रमेश धोंगडे यांनी शब्दस्तरावरील अभ्यास आणि जॉर्ज ग्रियर्सन यांच्या भारतीय भाषिक सर्वेक्षणांतर्गत झालेल्या मराठीच्या सर्वेक्षणाचा समावेश आहे.
संकेतस्थळावरील एखाद्या संकल्पनेवर क्लिक केल्यास एक शब्द विविध जिल्ह्यांत कोणत्या बोलीत बोलला जातो, याविषयीचे संदर्भ दिसतील. उदा. पूर्वीच्या काळातील घरांचे दरवाजे बंद करण्याकरता ज्या पद्धतीची कड़ी वापरली जात असे त्या 'आडना' या संकल्पनेकरता या सर्वेक्षणात कडी, कोयंडा, आगळ, आडना, खिट्टी, खटका, आडा, आडगुना, आडची, आडसर, दांडका, बिजीगिरी, मिचगार्या, टीचकनी, साखर्या, संकलकडी, पट्टीकडी, डांबर्या, माकडी, कुत्र, घोडी, माजरबोक्या, हूक, चाप, खांदूक, खडक आदी शब्दवैविध्य दिसून आले आहे.
भाषिक सर्वेक्षणामध्ये या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील बोलीमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. आडना या शब्दाखेरीज साखळी या एकाच वेगळ्या शब्दाची नोंद आहे. प्रकल्पात राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांतील २७७ गावांमधील एकूण अंदाजे २,९६२ व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वेक्षणात मुंबई शहर, जिल्हा आणि मुंबई उपनगर या शहरी जिल्ह्यांचा समावेश केलेला नाही.
मराठीच्या बोलीसाठी यापूर्वी अशा स्वरूपाचे काम झालेले नाही. राज्य शासनाच्या पुढाकाराने संस्थेने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजिटल स्वरूपातील संग्रह पुढील कित्येक पिढ्यांसाठी तयार केलेले भाषेचे वैभवच आहे. भाषेचे हे वैभव सर्वसामान्यांपासून ते पीएच.डी.धारक सर्वासाठी मोलाचे आहे. अशा स्वरूपाचे बोली-भाषा जतन करणारे अनेक प्रकल्प आगामी काळात संस्थेकडून राबविण्यात येणार आहेत.
- डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था