गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 01:38 PM2024-10-13T13:38:45+5:302024-10-13T13:39:25+5:30
बाबा सिद्दिकींची हत्या ही घटना अतिशय दु:खद आणि गंभीर आहे. बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. - फडणवीस
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या घटनेची फक्त चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हा, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना फटकारले होते. यावर आता फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे.
घडलेली घटना ही अतिशय दु:खद आणि गंभीर आहे. बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. त्यामुळे जी काही घटना घडली त्याने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. या केस मधले दोन आरोपी पकडलेले आहेत. अजून तपास चालू आहे. काही धागे दोरे मिळत आहेत. पण त्या संदर्भात आता लगेच बोलणे योग्य होणार नाही. आज त्यांची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल, तेवढी पोलिस माहिती देतील, असे फडणवीस म्हणाले.
तसेच शरद पवार यांना फक्त केवळ सत्ताच पाहीजे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतर ही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे, महाराष्ट्राचा विकास, सुरक्षा पाहिजे. त्यामुळे जे खुर्चीकडे पाहतायतात त्यांनी ते पाहावे, त्यांना जे बोलायचेय ते बोलावे, असे फडणवीस म्हणाले.
ज्या काही थेअरीज येतायत तशा प्रकारचे घडलेले नाहीय. ज्यांना जे वाटतेय तशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहेत. हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस यासंदर्भात माहिती देतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शरद पवार काय म्हणालेले...
"राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच मी बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे.