‘न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टीका’
By admin | Published: January 15, 2017 12:04 AM2017-01-15T00:04:28+5:302017-01-15T00:04:28+5:30
खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का
लातूर : खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ? या मुद्यावरुन टीकेचे लक्ष्य केले, अशी खंत विख्यात विधिज्ञ व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शनिवारी लातुरात व्यक्त केली़
अॅड. निकम यांच्या हस्ते ३४व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले़ यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिका डॉ़ प्रज्ञा दया पवार होत्या़ तर ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, डॉ़ जनार्दन वाघमारे, रविचंद्र हडसनकर, जि़ प़ चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, लेखिका संध्या रंगारी यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ समाज बदलण्यासाठी देव जन्म घेणार नाही़ उपास-तापासाने परिवर्तन होणारे नाही़; ते साहित्यातूनच घडेल़ समता, बंधुता व न्याय ही बाबासाहेबांनी सांगितलेली मूल्ये ज्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात, तोच खरा साहित्यिक़ अशा साहित्यातील विचार जगता आले पाहिजे. तेव्हाच बाबासाहेबांच्या विचारातील राष्ट्र घडेल, असे अॅड. निकम म्हणाले. (प्रतिनिधी)
अॅट्रॉसिटीचा विचार व्हायलाच हवा होता
संमेलनाध्यक्ष डॉ़प्रज्ञा दया पवार यांनी अॅड़ उज्वल निकम यांनी मांडलेले खैरलांजी प्रकरणातील काही मुद्दे आपल्या अध्यक्षीय भाषणात खोडून काढले़ त्या म्हणाल्या, या प्रकरणात अंतर्भूत करता येणाऱ्या काही बाबी झाल्या नाहीत़ दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच महिलांवरील शारीरिक अत्याचारावर काहीच विचार झाला नाही़ या प्रकरणाचा विचार करता या सर्व सुट्या भागांचा विचार होणे आवश्यक होते़ निकम यांनी यावर सविस्तर बोलायला हवे होते़ अर्थात, त्यांनी कायद्याच्या चौकटीत आपली बाजू प्रामाणिकपणे मांडली असावी़
दलित साहित्यामुळे क्रांतीयुगाचा प्रारंभ
संत साहित्याने भक्तीयुग तयार केले आहे़ तर दलित साहित्याने क्रांतीयुग तयार केले़ अशा या साहित्याला प्रेरणा देण्याचे कार्य गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून सातत्याने केले आहे, असे माजी खासदार डॉ़जनार्दन वाघमारे म्हणाले.
कृष्णा किरवले, संध्या रंगारी पुरस्काराने सन्मानित
अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या वतीने संमेलनात लेखकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही झाले़ यंदाचा ज्येष्ठ लेखक पुरस्कार कृष्णा किरवले यांना तर ज्येष्ठ लेखिका पुरस्कार प्राचार्य संध्या रंगारी यांना देण्यात आला.