मराठा क्रांती मोर्चानंतरही "सारथी"ची निर्मिती कागदोपत्रीच
By Admin | Published: May 15, 2017 07:17 PM2017-05-15T19:17:33+5:302017-05-15T19:17:33+5:30
राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यामुळे राज्य सरकारने मराठा, कुणबी, शेतीव्यावसायातील नागरिकांच्या मुलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती.
राम शिनगारे / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यामुळे राज्य सरकारने मराठा, कुणबी, शेतीव्यावसायातील नागरिकांच्या मुलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती. यामध्ये बार्टी संस्थेच्या धर्तीवर मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (सारथी) स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ९ डिसेंबर रोजी केली होती. यास सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी ही संस्था कागदोपत्रीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थेला अद्याप कार्यालय, कर्मचारी आणि निधी उपलब्ध झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढत आरक्षणसह इतर मागण्या केल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उत्सफुर्तपणे मोर्चे निघत होते. समाजातील असंतोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख, शहरात अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्रात शिक्षण घेत असलेल्या मुलांना निवासाची व्यवस्था करण्याची घोषणा केली. यासह तरुणांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ९ डिसेंबर २०१६ रोजी विधानसभेत केली होती. यानंतर ३ जानेवारी रोजी राज्य सरकारने या संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि बार्टीचे माजी महासंचालक डी. आर. परिहार या द्विसदस्यीय समितीची स्थापना केली. यासही पाच महिन्यांचा कालवधी उलटला आहे. तरी समितीची एकही बैठक अद्याप झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. समितीला बैठका घेण्यासाठी अद्याप कार्यालय उपलब्घ करुन देण्यात आलेले नाही. तसेच समितीचे प्रशासकीय कार्य पार पाडण्यासाठी कर्मचारी, निधीची तरतुदही करण्यात आलेली नाही. यामुळे सारथीची घोषणा कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले. याविषयी समितीचे सदस्य डी. आर. परिहार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी बोलण्याचे टाळले. समाजकल्याण विभागाच्या सचिवांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.
....बार्टीत मिळणार होते कार्यालय-
पुण्यातील बार्टीच्या कार्यालयातील १० बाय १२ ची एक खोली सारथी संस्थेचे कार्यालय म्हणून देण्याचा प्रस्ताव होता. मात्र डी. आर. परिहार यांनी बार्टीतील कार्यालयाला नकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचेळी परिहार यांना पुण्यातील ह्यसर्किट हाऊसमध्ये कार्यालय हवे असल्याचे समजते. संस्थेच्या कार्यालयासंबंधी अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. यामुळे समितीची एकही बैठक झालेली नसल्याचे समोर आले आहे.