हजारो कोटी खर्चूनही मुंबईकर खड्ड्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 02:02 AM2016-07-18T02:02:04+5:302016-07-18T07:22:59+5:30
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खडतर करणारे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे स्वप्न महापालिकेने तीन वर्षांपूर्वी दाखविले़
Next
>मुंबई- दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खडतर करणारे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे स्वप्न महापालिकेने तीन वर्षांपूर्वी दाखविले. प्रत्यक्षात करोडो रुपये ठेकेदार आणि अभियंत्यांच्या खिशात आणि मुंबईकर खड्ड्यात गेले आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या पत्रामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे बिंग फुटले. मात्र हे तर हिमनगाचे टोक असून, हा घोटाळा हजारो कोटींचा असण्याची दाट शक्यता आहे. चौकशीच्या पहिल्या फेरीतून अनेक धक्कादायक बाबींनी महापालिका हादरली. वर्षोनुवर्षे महापालिकेच्या तिजोरीला भगदाड पाडणाऱ्या या ठेकेदारांविरोधात पालिका प्रशासन कठोर पावले उचलत असताना अधिकारी घोटाळेबाज ठेकेदारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करीत आहेत.
धक्कादायक वास्तव
३८ ते १०० टक्के अनियमितता
निकृष्ट दर्जाचे काम, रस्त्यांवर परिणाम, रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस
एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली़
इतर अधिकाऱ्यांची या घोटाळ्यातील जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात येणार आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्याने निकषामध्ये बदल करीत ठेकेदारांच्या फायद्याचे नियम टाकले.
असा उघड झाला रस्त्यांचा घोटाळा
मलाईदार खाते म्हणून ओळखले जाणाऱ्या रस्ते विभागात दरवर्षी करोडो रुपयांची कामं होत असतात. नवीन रस्त्यांवरही वर्षभरात खड्डे पडत असल्याने मुंबई कायमची खड्डेमुक्त करण्याची घोषणा झाली. सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाच खड्डेमुक्तीचा उपाय असल्याचे भासवत २०१३ मध्ये साडेसात हजार कोटींचा अॅक्शन प्लॅन आखण्यात आला.
२०१३ ते २०१५ पर्यंत ३४ रस्त्यांची कामं झाली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा संशय महापौर स्नेहल आंबेकर यांनी गेल्या वर्षी व्यक्त करीत चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली. त्यानुसार चौकशीची समिती स्थापन झाली़.
> यांच्यावर झाली कारवाई
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक
थर्ड पार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक
के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आर. के. मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार
यापैकी आतापर्यंत तीन ठेकेदारांना अटक झाली़
पाच कार्यकारी अभियंत्यांनी या ठेकेदारांना वाचविण्यासाठी त्यांच्याकडून परस्पर तीन कोटी रुपये दंड वसूल केला आहे़ या अभियंत्यांना पालिकेची नोटीस
यामुळे दोन ठेकेदारांना जामीन मिळाला आहे़ तसेच त्यांच्यावरील कारवाईत भविष्यामध्ये
नरमाईने पाहिले जाण्याची शक्यता आहे.
>रस्ते घोटाळ्याचा ठपका असलेले ठेकेदार; यांनी घातली मुंबई खड्ड्यात
1. महावीर इन्फ्रास्ट्रक्चर
व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र किकावत
या कंपनीची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली़ बांधकाम व्यवसायात असलेल्या या कंपनीने १९९४ मध्ये रस्ते बांधणीला सुरुवात केली़ २००१ मध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि पूल बांधले़ वसंतलाल किकावत हे या कंपनीचे अध्यक्ष तर जितेंद्र किकावत व्यवस्थापकीय संचालक आहेत़
प्रमुख प्रकल्प - जेव्हीएलआर, सहार रोड, घोडबंदर रोड, एलबीएस मार्गाचे काँक्रीटीकरण, वांद्रे-कुर्ला संकुल येथे कलानगर जंक्शन ते एमटीएनएल जंक्शनचे मजबुतीकरण
2. कार्यकारी संचालक तेजस शाह
१९७३ मध्ये या कंपनीची स्थापना झाली़ या कंपनीमार्फत पायाभूत प्रकल्प आणि रस्ते बांधणीच्या क्षेत्रात कार्यरत आहे़ महामार्गांचे व रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण; पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची देखभाल, रस्त्यांची सुधारणा; मोठ्या प्रकल्पांचा अनुभव नाही़
3. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.
कार्यकारी संचालक नलिन गुप्ता
कंपनीची माहिती - १९८० मध्ये जेक़ुमार अॅण्ड कंपनी इंडिया प्रा़ लि़ असे या कंपनीचे मूळ नाव़ २००७ मध्ये या कंपनीने जेक़ुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि़ असे नामकरण केले़ रस्ते, पूल, महामार्ग बांधणीचे काम ही कंपनी करीत असते़
कंपनीचे प्रमुख प्रकल्प -मिलन पादचारी पूल, मोनोरेल, सायन-पनवेल महामार्ग, खेरवाडी उड्डाणपूल, जोगेश्वरी पूल़
4. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट्स
कार्यकारी संचालक नितीन शहा
मेसर्स आर.पी़.शाह नावाने १९६६ मध्ये स्थापन झाली़ कालांतराने या कंपनीचे नामकरण आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट्स असे करण्यात आले़
प्रमुख प्रकल्प - देवनार डंपिंग ग्राउंडमधील रस्ते, आणिक वडाळा मार्ग, मोहम्मद अली रोड
5. के. आर. कन्स्ट्रक्शन
भागीदार कोनार्क शाह
१९९७ मध्ये या कंपनीची स्थापना झाली़, तर राजेंद्र शाह आणि कोनार्क शाह असे दोन भागीदार आहेत़ नागरी बांधकाम, रस्ते बांधणी व दुरुस्ती़, मात्र कोणताही मोठा प्रकल्प नाही़
6. आर. के. मदानी
भागीदार नरेंद्र मदानी़
१९६६ मध्ये या कंपनीची स्थापना झाली. रस्ते बांधणी या कामामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. सेंट जॉर्ज रोड सीएसटी, मुसाफिरखाना रोड, चंदनवाडी रोड मरिन लाइन्स, नवरौजी हिल रोड चिंचबंदर, सीताराम पोद्दार रोड मरिन लाइन्स, दादी सेठ रोड, दत्ताराम लाल मार्ग लालबाग, भायखळा ए.जी.पवार, आचार्य दोंदे मार्ग परळ, जेरबाई वाडिया रोड परळ, व्ही.बी. वरळीकर मार्ग वरळी, ग्यान मंदिर रोड दादर पश्चिम., भायखळा येथील बाबासाहेब आंबेडकर रोड विक्रोळी कन्नमवारनगर २१९ ते २४४, कन्नमवार नगर २३२ ते १७३, कन्नमवार नगर २३६ ते २३९, मदन मोहन मालविय रोड आणि खेराज रोड मुलुंड रस्ता क्र. १४. पार्वती बाई शेट्टी मार्ग कांदिवली, गणेश नगर रोड कांदिवली, सुजाता हॉटेल ते धनसेव. हंस भुगरा रोड सांताक्रूझ, साइड स्ट्रीप, सीएसटी रोड सांताक्रूझ, सीएसटी रोड साइट स्ट्रीप सांताक्रूझ, सिटी इंटरनॅशनल रोड, साईड स्ट्रीप, आरटीओ रोड अंधेरी, साइड स्ट्रीप, बापू बागवे रोड दहिसर, साइड स्ट्रीप, एन. एल. कॉम्पलेक्स रोड दहिसर, साइड स्ट्रीप. गुरु गोविंद सिंग रोड घाटकोपर, साइड स्ट्रीप, वसरी हिल रोड मालाड, साइड स्ट्रीप, जयचंदलाल कारवा मार्ग मालाड, साइड स्ट्रीप, कल्याण, साइड स्ट्रीप, मालाड जलाशय रस्ता.