'महाआघाडी' होतानाच भाजपशी युतीचा प्रयत्न सुरू होता; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:49 AM2023-12-08T10:49:58+5:302023-12-08T10:50:30+5:30
हिवाळी अधिवेशनात आमदार अपात्रता सुनावणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी लांडे यांची उलटतपासणी केली
नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय हा नव्हता, असा अप्रत्यक्ष दावाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आमदार अपात्रता सुनावणीत केला. महाविकास आघाडी होत असतानाच काँग्रेससोबत झालेल्या युतीला मी विरोध दर्शविला होता. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी तेव्हा भाजपसोबत युतीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते, अशी माहिती लांडे यांनी साडेपाच तास चाललेल्या सुनावणीत दिली.
हिवाळी अधिवेशनात आमदार अपात्रता सुनावणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी लांडे यांची उलटतपासणी केली. बाळासाहेब हयात असताना तुम्ही शिवसेना का सोडली? तुम्ही मनसेत प्रवेश केला होता? तुम्ही पुन्हा कधी शिवसेनेत आलात? बाळासाहेबांच्या विचारानुसार राष्ट्रवादीसोबत युती करणे मान्य होते का, असे सवाल कामत यांनी लांडे यांना विचारले. यावर आपल्याला बोलायचे नसल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांची निवड उद्धव ठाकरे यांनी केल्याचे आठवत नाही, असेही ते म्हणाले.