सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:24 AM2024-11-22T05:24:54+5:302024-11-22T05:25:43+5:30

आमचेच सरकार येणार, महायुती व मविआ दोघांनाही ठाम विश्वास; आणखी २ एक्झिट पोलचा कौल महायुतीच्या बाजूने

Even before the announcement of the Maharashtra Assembly election results 2024, the Mahayuti and Maha vikas Aghadi have started to form the government | सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

दीपक भातुसे, मुंबई 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महायुतीमहाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबतच्या शक्यतांची चाचपणी करण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. तर, सत्ता स्थापनेसाठी गरज पडली तर निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांशी महायुतीकडून संपर्क केला जात आहे.

निवडणुकीत मविआला स्पष्ट बहुमत मिळाले तर कशा पद्धतीने पुढे जायचे, या पर्यायासह स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि बंडखोर तसेच अपक्षांची गरज लागणार असेल तर काय पावले उचलायची याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर उद्धवसेनेकडून खासदार संजय राऊत व अनिल देसाई उपस्थित होते. 

मविआच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची आणि नंतर सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. मविआचे सरकार आले तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील. त्यामुळे या भेटींना महत्त्व आहे.

संख्याबळाची जबाबदारी कुणाला यावरही खल

राज्यातील २८८ मतदारसंघाचा निकाल काय असेल, याबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मविआच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार कोणता बंडखोर आणि अपक्ष निवडून येऊ शकतो, सत्ता स्थापनेसाठी त्यांची गरज लागली तर त्यांच्याशी कोणत्या पक्षाने आणि कोणत्या नेत्याने संपर्क करावा, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एक्झिट पोलचे आकडे महायुतीला बहुमत दाखवत असले तरी मविआच्या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय निकालाच्या घेतलेल्या आढाव्यानुसार मविआचे सरकार येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला. 

महायुतीकडून संपर्क सुरू : महायुतीकडूनही सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरू झाली आहे. काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीला काठावरचे बहुमत मिळेल असा अंदाज आहे. अशा वेळी अपक्ष आपल्याबरोबर रहावेत यासाठी निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्षांशी महायुतीच्या नेत्यांनी संपर्क करणे सुरू केल्याचे समजते.

आणखी २ एक्झिट पोलचा कौल महायुतीच्या बाजूने

मुंबई : विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कौल दिला असतानाच गुरूवारी आलेल्या दोन एक्झिट पोलनेही राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे.

मतदानाच्या दिवशी सात संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलपैकी पाच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे बहुमताने सरकार येईल, असा अंदाज वर्तवला होता. गुरूवारी ॲक्सिस माय इंडिया आणि टुडे चाणक्य या दोन संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दाखवले असून, मविआतील तीन पक्ष मिळून १०० च्या आसपास जागा मिळवतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

संस्था - महायुती - मविआ - इतर

ॲक्सिस माय इंडिया - १७८ ते २०० - ८२ ते १०२ - ६ ते १२

टुडे चाणक्य - १७५ - १०० - १३

Web Title: Even before the announcement of the Maharashtra Assembly election results 2024, the Mahayuti and Maha vikas Aghadi have started to form the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.