"ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद नको; प्रहार आमदारांची संख्या १०-११ करणार"
By नितीन काळेल | Published: August 23, 2023 08:48 PM2023-08-23T20:48:03+5:302023-08-23T20:48:19+5:30
बच्चू कडू यांची घोषणा : आम्ही बसू तेथेच सरकार बसणार; मला दाबण्याची कोणात ताकद नाही
सातारा : मला दाबण्याची कोणाची ताकद नाही. मंत्रिपदही सर्वोच्च नाही. दिव्यांग मंत्रालय दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा खूप आभारी आहे. त्यामुळे ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही. उलट प्रहारची ताकद वाढवून आमदारांची संख्या १० ते ११ वर नेणार आहे. आम्ही बसू तेथे सरकार बसेल,’ अशी घोषणाच माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानासाठी सांगलीला जात असताना कडू साताऱ्यात थांबले होते.
बच्चू कडू म्हणाले, ‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढीमुळे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. शासनालाच पैसे जमा होणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पूर्वी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांबाबत केले. तेच आता भाजपही करत आहे. हे सरकार कांदा खाणाऱ्यांचा विचार करते. पण, पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा नाही. कांद्याचा दर वाढल्याने सरकार पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कांद्याचा दर कमी झाल्याने सरकार पडायला हवे. सातवा वेतन आयोग घेणारे, आयकर भरणारे कांदा महाग झाला म्हणतात. शेतकऱ्यांच्या मालावरच का ओरड होते. यावरुन लक्षात येते की कृषी क्षेत्रावर कोणाचे नियंत्रण नाही.
राज्यात नोकर भरती होत असून एक हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून कडू पुढे म्हणाले, ‘ केरळ राज्याच्या धर्तीवर वर्षाला परीक्षाऱ्थींकडून सर्वच परीक्षांसाठी एक हजार रुपये भरुन घ्यावेत. कारण, ही सेवा आहे. कमाईचे साधन नाही. त्याचबरोबर गुणवत्तेवर पेपर व्हावेत. कंपन्यांकडून परीक्षा न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या घेण्याची गरज आहे.
आपण स्पष्टपणे बोलता त्याचा तोटा होतो का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर कडू यांनी माझे आडनाव कडू आहे. त्यामुळेच मी भाेगतो आहे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहारची ताकद वाढविण्यासाठी काय करणार ? यावर त्यांनी विधानसभेला महायुतीकडे १५ जागा मागणार आहे. नाही मिळाल्यातर स्वतंत्र लढू. पण, १० ते ११ आमदार निवडूण आणणार, असा दावाही केला.
दादा मुख्यमंत्री होण्याबाबत भविष्यवेत्त्याला विचारतो...
राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत आले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद केव्हा मिळेल. यावर त्यांनी दादा पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री कधी होणार यासाठी भविष्यवेत्त्याला विचारतो, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील असेही स्पष्ट केले.