मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:34 AM2024-05-09T08:34:01+5:302024-05-09T08:34:34+5:30
सर्व पक्षांनी औकात वाढवावी, संघटनात्मक काम करावे, आपोआपच जागा मिळतील - जानकरांचा राजकीय पक्षांना सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (जि. पुणे) : लोकसभेनंतरही महायुती टिकून राहणार आहे. विधानसभेला ज्याची जिथे ताकद आहे, तसेच जागा वाटप होईल. त्यामुळे घटक पक्षांसह सर्व पक्षांनी भाजपसारखे संघटनात्मक काम करावे, आपोआपच जागा मिळतील. आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे नाही. मेलो तरी चालेल, पण धनुष्य-बाण, हात आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला, त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार आहे, असे मत माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केले.
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘अभिमान गहाण टाकणार नाही’
भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक न लढविल्याचा फटका बसणार नाही का?, या प्रश्नावर जानकर म्हणाले, स्वतःच्या पक्षाचा मला अभिमान आहे. कमळ चिन्हाची ऑफर होती. परंतु, दुसऱ्या पक्षाच्या महालापेक्षा माझी झोपडीच बरी आहे.
काहीही झाले, तरी पक्षाचा अभिमान गहाण टाकणार नाही. २०१४ ला बारामती शहराने माझ्यावर आणखी जरा प्रेम केले असते, तर पवारांना मी हरवले असते. त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलेही नव्हते.
‘महायुतीत बेबनाव नाही’
nजानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढत असून, महायुतीत कोणताही बेबनाव नाही. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. विकास करण्यासाठी तिजोरीच्या चाव्या हाती पाहिजेत.
nविरोधकांना पराभव दिसत असल्याने पैसे वाटपाचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. कोणी रडलं, तरी बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पाच हजारांनी का होईना निवडून येतील.