जून संपत आला तरी धरणांमधील पाऊस शंभरीही गाठेना!
By admin | Published: June 28, 2016 07:55 PM2016-06-28T19:55:13+5:302016-06-28T19:55:13+5:30
जून महिना धो धो पावसाचा... मे महिन्याच्या शेवटापासून सुरू होत असलेला पाऊस जून महिन्यात मुसळधारपणे पडतो आणि धरणांमधील पाणी वाढू लागते.
जिल्हयातील स्थिती : पाणलोट क्षेत्रात थेंबभर पाण्याचा येवा नाही
पुणे, दि. २८ - जून महिना धो धो पावसाचा... मे महिन्याच्या शेवटापासून सुरू होत असलेला पाऊस जून महिन्यात मुसळधारपणे पडतो आणि धरणांमधील पाणी वाढू लागते. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी मुसळधार पाऊस मात्र पडलेला नाही. पुणे जिल्हयातील २५ धरणांपैकी ३ धरणे वगळता सर्व धरणांमध्ये १ जूनपासून २७ जूनपर्यंत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाण्याच्या एका थेंबाचा येवा झालेला नाही.
दरवर्षी साधारणत: ७ जूनला मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि मुसळधार पावसास सुरूवात होते. पुणे जिल्हयात पावसाची संततधार सुरू असते. त्यामुळे जून महिन्यातच धरणांमध्ये पावसाचे पाणी जमा होण्यास सुरूवात होते. गतवर्षी पुण्यासह राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे दुष्काळही पडला. मात्र जून महिन्यात उशीरा सुरू झालेल्या पावसाने धरणांमध्ये पाणीसाठा जमा होण्यास सुरूवात झाली होती. यंदा राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या पुणे जिल्हयातील धरणांमध्ये जून महिन्यात पाणीसाठा होईल आणि सगळीकडे सुरू असलेली पाणीकपात बंद होईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात जून महिन्यात पुणे जिल्हयात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. त्यातही जिल्हयात असलेल्या २५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडलेला आहे.
दरवर्षी साधारणत: जून महिन्यात या धरण क्षेत्रांमध्ये २०० ते २५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेला असतो. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी २२ धरणांमधील पडणाऱ्या पावसाला १०० मिमीचा आकडाही गाठता आलेला नाही. १ जूनपासून आत्तापर्यंत उजनी धरणामध्ये सर्वाधिक १६६ मिमी पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ मुळशी धरणात १५० मिमी आणि टेमघर धरणामध्ये १०३ मिमी पाऊस पडला आहे. सर्वात कमी १७ मिमी पाऊस हा डिंभे धरणात पडला आहे. त्याचपाठोपाठ माणिकडोह, वडज, भामा आसखेड धरणात ३४ मिमी, कळमोडी धरणात ३९, चासकमान धरणात २९ मिमी, कासारसाई धरणात ३५ मिमी, खडकवासला धरणात ३१ मिमी, नाझरे धरणात ३७ मिमी पाऊस पडला आहे.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने धरणांमध्ये पावसाच्या पाण्याचा एक थेंबही येवा झालेला नाही. अगोदरच धरणांनी तळ गाठलेला असताना पाऊस पडत नाही आणि त्यामुळे पाणी येत नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे.
धरणदि. १ ते २७ जूनपर्यंत पाऊसपाण्याचा येवा
पिंपळजोगे४३ ०
माणिकडोह३४ ०
येडगाव७२ ०
वडज३४ ०
डिंभे१७ ०
घोड५३ ०
विसापूर४२ ०
कळमोडी३९ ०
चासकमान२९ ०
भामा आसखेड ३४ ०
वडिवळे९९ ०
आंध्रा५६ ०
पवना९७ ०
कासारसाई३५ ०
मुळशी१५० ०
टेमघर१०३ ०
वरसगाव७१ ०
पानशेत६६ ०
खडकवासला ३१ ०
गुंजवणी५६ ०
निरा देवधर६१ ०
भाटघर७५ ०
वीर७१ ०
नाझरे३७ ०
उजनी१६६ ०