शिवसेना बाहेर पडली तरी सरकारवर परिणाम होणार नाही - रामदास आठवले

By admin | Published: May 18, 2016 03:44 PM2016-05-18T15:44:53+5:302016-05-18T15:44:53+5:30

शिवसेना सत्तेतुन बाहेर पडणार नाही आणि जरी सेना सत्तेतुन बाहेर पडली तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले

Even if Shivsena goes out, the government will not be affected - Ramdas Athavale | शिवसेना बाहेर पडली तरी सरकारवर परिणाम होणार नाही - रामदास आठवले

शिवसेना बाहेर पडली तरी सरकारवर परिणाम होणार नाही - रामदास आठवले

Next
>ऑनलाइन लोकमत - 
सोलापूर, दि. 18 - राज्यात महायुतीची सत्ता आहे, काही कारणास्तव भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत मतभेद सुरू आहेत. जो काही वाद आहे तो चव्हाट्यावर न मंडता तो एकत्र बसुन सोडवणे गरजेचे आहे.  काही झाले तरी शिवसेना सत्तेतुन बाहेर पडणार नाही. जरी सेना सत्तेतुन बाहेर पडली तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पाठींबा दिला आहे, अन्य पक्षाची तडजोड होईल आणि सत्ता कायम राहिल असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे राष्ट्रीय नेते खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 
 
एका खासगी कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौ-यावर आले असता बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रामदार आठवले बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने हेच काम केले. या प्रकारामुळे विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी दोन्ही पक्षाला बाजुला सारले. हाच प्रकार भाजप-सेनेत राहिला तर पुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आगामी काळात राज्यात मुंबई, पुण्यासह १0 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजप-सेना-रिपाइं अशी महायुती राहिली तर सत्ता सहज प्राप्त होईल. भाजप-सेना एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न राहिल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता प्राप्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त महापौर रिपाइंचा असावा अशी आपली मागणी असणार आहे. जर काही कारणास्तव महापालिका स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तर आरपीआय तर्फे ५0 टक्के जागा या दलितोत्तर समाजाला दिल्या जातील असे आठवले यावेळी म्हणाले. 
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आजवर ज्या ज्या पक्षाशी युती केली त्यांना दलितांची मते मिळाली, मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मात्र त्यांची मते मिळाली नाहीत. शरद पवारांनी मला तीन वेळा निवडुन आणले चौथ्यांदा माझा परावभ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा प्रकार पाहुन मी भाजप-सेनेला पाठिंबा दिला. निवडणुकीपूर्वी केंद्रात एक कॅबिनेट मंत्री पद, राज्यात २ विधानपरिषदेची आमदारकी, एक कॅबीनेट मंत्रीपद, १0 महामंडळे असा लिखीत करार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत झाला होता. त्याची पूर्तता अद्याप झाली नाही, म्हणुन मी लगेच निर्णय घेणार नाही. आम्ही त्यांना वेळ दिला आहे, दिलेला शब्द भारतीय जनता पार्टीने पाळावा अन्यथा पुढील निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. मी मंत्री नाही म्हणून माझे काम थांबले नाही, सत्तेत असो नसो माझे काम सुरू आहे. कार्यकर्ते कायम माझ्यासोबतच आहेत, त्यांना घेऊन मी काम करत असतो. पूर्वी ग्रामीण भागात दलित समाजावर अन्याय अत्याचार होत होता, आता तो शहरातही आला आहे. पनवेल येथील दलित तरूणांवरील हल्ला पाहता विचार करायला भाग पाडणार आहे. अंतरजाती विवाहला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जाती तोडो समाज जोडो’ हे अभियान घेऊन मी संपूर्ण देशाचा दौरा करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपाइं (अ) चे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश बारसिंग, प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, एस.आर. गायकवाड, अरूण भालेराव, लकी रणधिरे, सिद्धु पांडगळे, सोमनाथ भोसले, राजेश उबाळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
पत्रकार परिषदेतील इतर महत्वाचे मुद्दे -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक व्हिजन घेऊन निघाले आहेत. आज त्यांना विविध देशांकडुन आमंत्रण दिले जात आहे. पूर्वी कोणत्याही पंतप्रधांनाना असा मान मिळला नव्हता, खरोखर मोदींचे काम चांगले आहे. भारताचा पंतप्रधान आज जगाच्या नकाशावर दिसत आहे. 
 
- वाढता जातीवाद, दलित समाजावरील हल्ले लक्षात घेता शासनाने दलित वस्त्यांना संरक्षण दिले पाहिजे. स्वरक्षणासाठी बंदुकांसारख्या शस्त्रांचा परवाना दिला पाहिजे. 
 
- ‘सैराट’ चित्रपटात समाजातील सत्य घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
 
- आगामी महापालिका निवडणुकीत करण्यात आलेली प्रभाग पद्धत चुकीची आहे. संविधानात वॉर्ड पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे. प्रभाग पद्धतीमध्ये येणार उमेदवार सुद्धा पडण्याची शक्यता असते. यामुळे छोट्या छोट्या पक्षाचे नुकसान होणार आहे. प्रभाग पद्धत न ठेवता वॉर्ड करण्यात यावा या मागणीसाठी रिपाइं तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पुढील काळात प्रत्येक तहसिलदारांना हे निवेदन दिले जाईल आदी विषयावरही प्रकाश टाकण्यात आला.
 

Web Title: Even if Shivsena goes out, the government will not be affected - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.