"स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू; तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी"
By कमलेश वानखेडे | Published: March 1, 2024 02:51 PM2024-03-01T14:51:57+5:302024-03-01T14:52:20+5:30
सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
नागपूर : राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी झाली आहे. फक्त दोन जागा आवाक्याबाहेरील आहे. महाविकास आघाडीशी ताळमेळ जुळला नाही व आम्ही स्वतंत्र लढलो तरी किमान सहा जागा जिंकु, असा दावा करीत तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून विचार करावा, असा चिमटा वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी घेतला.
ॲड. आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले, सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे. आधी त्यांची चर्चा होते व नंतर ते आम्हाला बोलावतात. या चर्चेत सध्या आम्ही उपरे आहेत, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यभर १० मार्चपर्यंत ४२ जागांवर वंचितच्या जाहीर सभा होतील. आमच्या सोबत किती लोक आहेत हे सभांमधूून दिसत आहे. आम्ही सभेसाठी जेवन, गाड्या देत नाही. आमच्या विचारांना समर्थन देणारे स्वत:हून येतात, असेही त्यांनी सांगितले.
भाजपकडून नेते खरेदीचा सपाटा
- भाजपने पक्ष फोडणे व नेते विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भाजप घाबरलेली दिसत आहे. भीतीपोटी ४०० पार ची आकडेवारी वांरवार सांगितली जात आहे. भाजप नेते विकत घेईल पण कार्तकर्ते व मतदार विकत घेता येणार नाही, असे सांगत हे दोन्ही घटक भाजपच्या विरोेधात असल्याचा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला.
मी अकोल्यातूनच लढणार
- आपण स्वत: अकोला येथूनच लढणार असे ॲड. आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महाविकास आघाडीशी युती झाली तर सोशल डेमोक्रसीच्या मुद्यावर भर देऊ. १५ उमेदवार ओबीसी व ३ उमेदवार अल्पसंख्यक समाजातील असावे, अशी अट घातली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतावर जीडीपीच्या ८३ टक्के कर्ज
वर्ल्ड बॅंकेने भारताला इशारा दिला आहे की, जीडीपीच्या ८३ टक्के कर्ज झाले आहे. निवडणूका होऊन नवे सरकार येईपर्यत ते ८७ टक्क्यांपर्यंत जाईल. २०१४ मध्ये जीडीपीच्या २४ टक्केच कर्ज होते. १० वर्षात ते ८७ टक्के झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठअयावर आहे. भाजपने १० वर्षात अर्थव्यवस्था पोखरली, असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.