ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाने नंबर वन राहण्याची परंपरा टिकवली - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:26 PM2022-08-05T19:26:14+5:302022-08-05T19:27:05+5:30
Chandrakant Patil : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपाने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई : राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपा आणि शिंदे गटाचा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपाने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकवली आहे. या यशाबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात ठिकठिकाणी काल मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविले असून भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजपा – शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात सत्ताबदल होऊन भाजपा –शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.