जव्हारमध्ये उकाड्याने लाहीलाही
By admin | Published: March 3, 2017 03:14 AM2017-03-03T03:14:40+5:302017-03-03T03:14:40+5:30
यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे.
हुसेन मेमन,
जव्हार- होळी सणानंतर उष्म सुरू होतो, मात्र यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे. गेल्या तीन दिवसांत पारा ३९ अशांवर पोहोचला आहे. किमान तापमानातही दिवसगणिक वाढ होत असल्याने आता उन्हाचे चटके आणि झळा यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे जव्हारकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. यामुळे शीतपेयांची तसेच बाटलीबंद थंड पाण्याची मागणी सतत वाढते आहे. त्यात भारनियमनाची भर पडल्याने पंख्याचा वारा घेणेही शहरवासियांना अवघड झाले आहे. तळमळत बसण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.
मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेले जव्हार शहर गेल्या काही वर्षांपासून जंगल तोड होत असल्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे प्रचंड तापते आहे. मागील काही दिवसांत अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसाने नागरीकांची चांगलीच झोप उडवली होती, त्यानंतर अचानक उन्हाच्या तडाख्याचा जोर इतका वाढला की, जमिनीतील वाफ आणि वरून सूर्यप्रकाशाचा मारा अशा स्थितीत पारा वाढतच चालला आहे.
गेल्या दोन दिवसांत तापमानात दिवसगणिक दोन अंशाची वाढ झाली आहे. किमान तापमान १६ वरून १८ आणि कमाल तापमान ३६ वरून ३९ वर पोहोचले आहे. तापमानवाढीचा वेग कायम राहिल्यास थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वरची ख्याती असलेल्या जव्हारचे तापमान ४२ च्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.