संमेलनाआधीच निमंत्रण‘नाट्य’
By admin | Published: February 19, 2016 03:28 AM2016-02-19T03:28:58+5:302016-02-19T03:28:58+5:30
नाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात
महेंद्र सुके , ठाणे
नाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात किंवा अध्यक्षीय भाषणात मांडलेल्या मुद्द्यांविषयीचा पाठपुरावा करण्याची संधीच मिळत नाही, अशी खंत बेळगाव येथे झालेल्या ९५व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ रंगकर्मी फय्याज शेख यांनी व्यक्त केली. परिणामी, ठरावांच्या पाठपुराव्याकरिता समिती नेमण्याचा निर्णय केवळ कागदावर राहिला आहे.
खुल्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ‘पाठपुरावा समिती’ स्थापन करून प्रलंबित ठराव मार्गी लागावेत, अशी घोषणा बेळगावच्या संमेलनात करण्यात आली होती. याविषयी, फय्याज यांना विचारले असता, नाट्य परिषद नाट्यसंमेलनस्थळी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना बोलवत असते. त्या बैठकीत झालेले ठराव खुल्या अधिवेशनात पारित करण्यात येतात; मात्र संमेलन संपल्यानंतर वर्षभर त्याविषयी काहीही सांगितले जात नाही. वर्षभरात होणाऱ्या बैठकांना बोलावलेच जात नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात फय्याज अध्यक्षपदाची सूत्रे ९६व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपविणार आहेत. त्यानिमित्ताने फय्याज यांनी व्यक्त केलेली खंत आणि नाट्य परिषदेने राबविलेल्या अभिनंदनीय उपक्रमांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाट्यसंमेलनावर बालनाट्यांचा प्रभाव
ठाणे : नाट्यसंमेलनावर या वर्षी बालनाट्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. रविवारी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ‘शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा समावेश करावा’ हा महत्त्वाचा ठराव मांडला जाऊ शकतो.
नाट्यसंमेलनाच्या समारोपाला रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीचे औचित्य साधून ‘नाट्यशिक्षणा’चा ठराव मांडला जाण्याची चर्चा परिषदेच्या वर्तुळात आहे.
बेळगाव येथे झालेले ९५वे नाट्यसंमेलन तेथील पोलिसांनी आयोजकांवर लादलेल्या अटी आणि शर्तींवर झाले होते. त्यामुळे ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रा’चा दरवर्षी येणारा ठराव त्या संमेलनात नव्हता. ठाण्याच्या संमेलनात हाही ठराव परंपरेने येण्याची शक्यता आहे.
बालरंगभूमी सक्षम व्हावी, बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी बालनाट्यसंमेलन घेण्याचा ठराव बेळगावच्या नाट्यसंमेलनात एकमताने मंजूर झाला होता. त्यानुसार, सोलापुरात हे संमेलन घेण्यात आले. यासाठी राज्य शासनाकडे १ कोटी रुपयांची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे मात्र समजू शकले नाही.
ठाण्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत मोठ्या प्रमाणात बालनाट्ये सादर होणार आहेत. या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या बालनाट्य स्पर्धेत ठाण्याचे ‘डराव डराव’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले होते. या नाटकासह अनेक बालनाट्यांचे आविष्कार या संमेलनात रसिकांना पाहता येतील. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.