Maharashtra Election 2019; झोपेतही अमित शहा ३७०-३७० च म्हणत असतील : शरद पवारांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:26 PM2019-10-12T17:26:37+5:302019-10-12T19:21:51+5:30
बार्शी येथील राष्ट्रवादीच्या सभेत नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका
सोलापूर/बार्शी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिकडे जातील तिकडे ३७०-३७० असे करीत आहेत. काश्मीरमधील ३७० रद्द केले, त्याचा आम्हाला आनंद आहे व आमचा पाठिंबाही आहे. पण कोण चाललंय जमीन घ्याला काश्मीरला. दिवस-रात्र अमित शहा ३७०-३७० म्हणत आहेत़ रात्री झोपेतही ३७० म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांना यांच्यावर केली़
बार्शी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मी ५२ वर्षे निवडून जातोय़ मतदार उगीच आम्हाला निवडून देत नाहीत़ आम्हाला काय केले म्हणणाºयांनी शिवस्मारकाचे काय झाले, इंदू मिलचे काय झाले, असा सवाल करत महाराजांच्या नावाची खोटी आश्वासने या सरकारने दिली आहेत. आम्ही शिवरायांची परंपरा जतन केली. मात्र हे सरकार शिवरायांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याचा ठराव करते आहे. किल्ल्यावर आता तलवारींच्या खणखणाटाऐवजी झमझम पाहिजे काय? शिवराय व बाबासाहेबांच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करीत आहे हे लोकांना कळून चुकले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेती व शेतकरी अडचणीत सापडला आहे. १६ हजार शेतकºयांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत, मग ही कसली कर्जमाफी. शेतकºयांची फसवणूक करणारी यांच्यासारखी दुसरी राजवट नाही, अशी टीका पवार यांनी केली. आम्ही आजवर टेंभुर्णी, इंदापूर, कुरकुंभ, चाकण अशा कितीतरी औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. हजारो कारखाने काढून बेरोजगारांच्या हातांना काम दिले. यांच्या राजवटीत कारखाने बंद पडायला लागले आहेत. आर्यन कारखानाही बंद आहे, मग यांना मत का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांचे नागपूर हे गुन्हेगाराचे केंद्र बनले आहे. भाजपचे अनेक स्वामी महिलांवर अत्याचार करीत आहेत. अशा बेशरम माणसांना त्यांची जागा दाखवा. महिलांना सन्मान नाही, हाच का शिवछत्रपतींचा आदर्श, काय चाललंय या राज्यात? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.