शिवसेनेसाठी राज्यसभेची वाट बिकट; अपक्षासह छोटे घटकपक्षही मविआ सरकारवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:09 PM2022-06-06T20:09:50+5:302022-06-06T20:10:20+5:30
अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे
मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका मतालाही खूप किंमत आहे. त्यातच अपक्ष आणि छोटे पक्षांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी किंबहुना शिवसेनेसाठी राज्यसभेची वाट बिकट असल्याचं दिसून येते.
काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीने सत्तास्थापनेवेळी राज्यात १७० चा आकडा गाठला होता. मात्र आता वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं सरकारला घेरलं आहे. तर हितेन ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी तीन मते गृहीत धरू नये, असं ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे बविआची ३ मते कुणाच्या पारड्यात पडणार हेदेखील सांगता येत नाही.
त्यातच अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षानं अल्पसंख्याक विकास आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीला मोठा झटका बसला आहे. समाजवादीचे अबू आझमी आणि रईस शेख असे २ आमदार आहेत.
हितेंद्र ठाकूर म्हणाले की, काही पक्षांनी बविआचा पाठिंबा मिळेल, असे गृहित धरलेले आहे. मात्र, माझ्या पक्षाचा किंवा तिन्ही आमदारांच्या पाठिंब्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दोन्ही आमदारांसोबत बसून चर्चा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर निर्णय जाहीर करेन, तोपर्यंत कोणीही आमची तीन मते ग्राह्य धरू नका असे ते म्हणाले. जे उमेदवार उभे आहेत, त्यांनीही संपर्क साधल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तर अद्याप MIM, मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू
राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.