वय मोठं असलं तरी ‘पसंत आहे मुलगी..!’

By admin | Published: August 8, 2016 01:45 AM2016-08-08T01:45:04+5:302016-08-08T01:45:04+5:30

मैत्रीला आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते, मग लग्नाबाबत तरी ते का असावे? ‘ती’ वयाने मोठी असली म्हणून काय झाले, तिच्यात सहजोडीदार सापडला की झाले.

Even though the age is big, 'dear girl ..!' | वय मोठं असलं तरी ‘पसंत आहे मुलगी..!’

वय मोठं असलं तरी ‘पसंत आहे मुलगी..!’

Next

पुणे : मैत्रीला आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते, मग लग्नाबाबत तरी ते का असावे? ‘ती’ वयाने मोठी असली म्हणून काय झाले, तिच्यात सहजोडीदार सापडला की झाले... हे भाष्य ऐकून जरा आश्चर्य वाटेल! पण आता काहीशी अशी विचासरणी विवाह संस्थेत डोकावू लागली आहे. लग्नबंधनात अडकताना वधू ही वरापेक्षा लहानच असली पाहिजे, या पूर्वापार चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेला छेद देत आता वयाने मोठी वधू करण्याकडे कल वाढला आहे. निर्णय घेण्याची क्षमता, आर्थिक स्थैर्य आणि स्वभावातील परिपक्वता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींशी लग्ने करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
काही दशके मागे गेलात तर आठवेल, मुलाच्या वयापेक्षा मुलीचे वय कमीच असावे असा आग्रह असायचा. यामध्ये अधिकतर अधिकारशाही गाजविण्याची प्रवृत्ती आणि आपल्यावर ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अवलंबून कशी राहील हीच पुरुषी मानसिकता होती. मात्र आता काळ बदलला आहे, एकविसाव्या शतकात मुलीही नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहण्याची गरज त्यांना राहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी प्रेमविवाहामध्ये मुलगी वयाने मोठी असल्याचे कळल्यावर सर्वप्रथम विरोध केला जायचा तो त्याच्या कुटुंबाकडूनच. सुरुवातीला नाकं मुरडली जायची, पण तो ठाम आहे असं म्हटल्यावर होकार मिळायचा.
पण आता ‘ती’ मोठी आहे हे सांगितल्यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. दोन ते आठ वर्षे वयाने
मोठी असलेल्या मुलीशी लग्न करण्याला मुलांकडूनच नव्हे तर त्याच्या
कुटुंबाकडूनही होकार मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे, अ‍ॅरेंज मॅरेजमध्येही वयोमर्यादा काहीशी धूसर झाली आहे.
मुलगी एक किंवा दोन वर्षांनी मोठी असली तरी त्या बाबीकडे दुर्लक्ष करून विवाह करण्याचा टे्रंड रूजू लागला आहे. आर्थिक स्थैर्य, निर्णयक्षमता आणि परिपक्वता यामुळे लग्नासाठी मोठ्या मुलींना मुलांकडून प्राधान्य दिले जात आहे. लव्ह मॅरेजबरोबरच अ‍ॅरेंज मॅरेजमध्येही हे प्रमाण वाढले आहे. बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेची ही नांदीच ठरली असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Even though the age is big, 'dear girl ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.