राज ठाकरेंचा ‘सुपरपंच’ केव्हा?; मनसेचे इच्छुक उमेदवार सध्या द्विधा मनस्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:13 AM2022-03-03T08:13:20+5:302022-03-03T08:15:09+5:30
मुंबईत गत आठवड्यात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मनसेच्या १७० इच्छुकांची यादी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी पुढील आठवड्यात अमित ठाकरे हे नाशिकचा दौरा करून प्रत्येक इच्छुकाशी वन टू वन संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले
नाशिक : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. मात्र, मार्च महिना उजाडूनही मनसेकडून अद्यापही कोणतीच मोठी हालचाल केली जात नसून राज ठाकरे किंवा अमित यांच्या दौऱ्यांनाही प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा ‘सुपरपंच’ केव्हा बसणार, अशी प्रतीक्षा लागली आहे. तर काही उमेदवार भाजपाशी युती होण्याच्या प्रतीक्षेत असून, तसे झाल्यास आपल्याला नक्की पक्ष उमेदवारी देणार की नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत.
भाजपासारख्या पक्षाने तर निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग देऊन निवडणूक प्रभारी म्हणून संकटमोचक गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दौऱ्यासह विविध आंदोलनांच्या निमित्ताने शिवसेना पक्ष आणि इच्छुक उमेदवार चांगलेच सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकांतून पालकमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळदेखील सक्रिय झाल्याचे तर कार्यकर्ते आंदोलनांद्वारे राष्ट्रवादीचे इच्छुक जनसंपर्काच्या मोहिमेत भिडले आहेत. मात्र, मनसेच्या गोटात अजून मोठ्या हालचालींना सुरुवातच झालेली नाही. मनसेतील काही एकांडे शिलेदार आपापल्या प्रभागात निवडणुकांच्या तयारीला लागले असले तरी प्रभागात अन्य उमेदवार तितकेसे तगडे उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पक्षाने भाजपाशी युती केल्यास त्यांचे उमेदवार मिळून निदान दोन आकडी संख्या गाठता येईल, असा मनसेच्या काही इच्छुकांचा अंदाज आहे. मात्र, त्याबाबतही पक्षस्तरावरून कोणतेच सिग्नल मिळत नसल्याने एकट्याने तयारीला लागावे, प्रचाराला वेग द्यावा की प्रतीक्षा करावी, अशा संभ्रमात आहेत. त्यातही अशा इच्छुकांना राज ठाकरे यांनी गत आठवड्यात कानपिचक्या दिल्याने प्रभागात प्रबळ दुसरे उमेदवार नसलेल्या मनसे इच्छुकांची अवस्था सध्या तरी तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशीच झाली आहे.
अमित ठाकरेंच्या दौऱ्याचीही चर्चाच
मुंबईत गत आठवड्यात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मनसेच्या १७० इच्छुकांची यादी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी पुढील आठवड्यात अमित ठाकरे हे नाशिकचा दौरा करून प्रत्येक इच्छुकाशी वन टू वन संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप त्यांच्या दौऱ्याची गंधवार्तादेखील पदाधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या दौऱ्याची आणि राज ठाकरे यांच्या सुपरपंचची प्रतीक्षा करणे इतकेच पदाधिकाऱ्यांच्या हातात आहे.