भलतेच औषध देणाऱ्या दुकानावर ‘एफडीए’चा बडगा
By admin | Published: October 6, 2014 04:37 AM2014-10-06T04:37:47+5:302014-10-06T04:37:47+5:30
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी अधिक नफ्याच्या हव्यासातून भलतेच औषध दिले जात असल्याचे यवतमाळात उघडकीस आले आहे
सुरेंद्र राऊत, यवतमाळ
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी अधिक नफ्याच्या हव्यासातून भलतेच औषध दिले जात असल्याचे यवतमाळात उघडकीस आले आहे. संबंधित दुकानदाराविरुद्ध एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाविरुद्ध न्यायालयात थेट खटलाच दाखल केला आहे.
येथील जिजाऊ हेल्थ केअरच्या संचालकाकडून एका रुग्णाला २०११मध्ये भलतेच औषध देण्यात आले होते. सतीश पंजाबराव ठाकरे यांना अॅमिकॅसिन इंजेक्शनऐवजी अॅक्रीस हे इंजेक्शन देण्यात आले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी भलतेच औषध दिल्याने ठाकरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एफडीएने मेडिकल स्टोअर्सचा परवाना कायमचा रद्द केला होता. मात्र संबंधित चालकाने त्यास अपील करून ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करण्याचा आदेश मिळविला होता. मात्र या मेडिकल स्टोअर्स चालकाच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. २९ आॅगस्टला हेल्थ केअरच्या चालकाने प्रवीण खडतकर यांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी डॉक्टरांच्या परवानगीविना पुन्हा भलतेच औषध दिले. या प्रकरणी खडतकर यांनी एफडीएकडे तक्रार केली. त्याची दखल घेत मेडिकल स्टोअर्स चालकाविरुद्ध सहायक आयुक्तांच्या निर्देशावरून एफडीएचे निरीक्षक प्रवीण राऊत यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
हॉस्पिटलच्या आवारात मेडिकल स्टोअरला जागा देताना मोठे डिपॉझिट घेतले जाते. शिवाय औषधांच्या विक्रीवर हॉस्पिटलला कमिशन द्यावे लागते. त्यातूनच कमी दर्जाची व भलतीच औषधे देण्याचे प्रकार घडतात. ही बाब तपासणीत निष्पन्न झाली, असे एफडीएचे सहायक आयुक्त अमृत निखाडे यांनी सांगितले. असे प्रकार पुन्हा आढळल्यास थेट न्यायालयीन कारवाईला संबंधितांना सामोरे जावे लागेल, असेही निखाडे यांनी सांगितले.