पावसाळा संपला, तरी का पडतोय पाऊस? ओडिशा भागात ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:54 AM2024-10-22T10:54:24+5:302024-10-22T10:55:05+5:30

शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे

Even though the monsoon is over, why is it raining Cyclone Dana will hit Odisha region | पावसाळा संपला, तरी का पडतोय पाऊस? ओडिशा भागात ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ धडकणार

पावसाळा संपला, तरी का पडतोय पाऊस? ओडिशा भागात ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ धडकणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातून नैर्ऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजून किती दिवस पाऊस पडणार, असा सवाल शेतकरीही विचारत आहेत. शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. बंगालच्या उपसागरात २३ ऑक्टोबरनंतर ‘दाना’ चक्रीवादळ येणार आहे.

सध्या नैर्ऋत्य मान्सून आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. हवामानाची प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची, तसेच २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे, तसेच २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिसा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मान्सून परत गेला, तरी काही काळ पाऊस सुरूच राहतो. कारण, राज्यावर बाष्प असते. तापमानही वाढलेले असते. यामुळे ढगांची निर्मिती होते आणि कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. हीच स्थिती राज्यामध्ये निर्माण होत आहे. काही दिवस अशीच परिस्थिती असणार आहे आणि त्यानंतर, हवामान कोरडे राहणार आहे. दिवाळीमध्ये हवामान कोरडे राहील.

बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ २४ ते २५ ऑक्टोबरला ओडिसाच्या किनारपट्टीवर तयार होणार आहे. त्याच्या प्रभावामुळे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज मराठवाड्यात पावसाची शक्यता

हिंगोली :  प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार २२ रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. २२ ऑक्टोबर रोजी लातूर, धाराशिव, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू

सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) :   शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर व १५ वर्षीय मुलीवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला भाजल्याची घटना तालुक्यातील बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अजय नत्थू राठोड व अश्विनी मच्छिंद्र राठोड अशी मृतांची नावे आहेत.  

Web Title: Even though the monsoon is over, why is it raining Cyclone Dana will hit Odisha region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.