शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

By यदू जोशी | Published: May 28, 2023 06:46 AM2023-05-28T06:46:13+5:302023-05-28T06:46:39+5:30

‘महाविजय २०२४’ : बूथपर्यंत बांधणीची व्यूहरचना, वॉररूमही स्थापणार

Even where eknath Shinde group shiv sena MP BJP has started strong preparations elections 2024 lok sabha politics | शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांमध्येही भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बूथरचनेपासून वॉररूम उभी करण्यापर्यंत सर्व यंत्रणा इथे उभी केली जात आहे. भाजपने चालविलेल्या या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवरच  सावध झालेल्या शिंदे गटाकडून २२ जागा लढण्याचा मानस बोलून दाखविला गेला, असे म्हटले जात आहे. 
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटातील खासदारांची तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली व त्यानंतर  लोकसभेच्या २२ जागा युतीमध्ये मागण्याची भाषा सुरू झाली. मात्र, त्याचवेळी भाजपने शिंदेंच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये समांतर प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम हाती घेतले आहे. 

अशी करत आहेत तयारी...
शक्तीकेंद्र प्रमुखांपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी संघटनात्मक ढाचा तयार केला जात आहे. 
कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील याचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी सारखीच जय्यत तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल हा तुमचा विषय नाही. 
आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून आपल्याला काही करण्याची गरज नाही असे अजिबात समजू नका, असे निर्देश खालपर्यंतच्या यंत्रणेला देण्यात आले आहेत. 

शिंदे समर्थक खासदारांची चिंता
भाजपइतकी संघटनात्मक रचना शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागेल. भाजपची तयारी आपल्याला पूरकच असल्याचे शिंदे गटाला वाटत होते. पण तयारी करता करता भाजप जागेवर दावा तर सांगणार नाही ना, अशी शंका शिंदे समर्थकांना सतावत आहे. 

लहान-मोठ्या नेत्यांचे ‘इनकमिंग’
शिंदे व ठाकरे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघांमधील विविध पक्षांच्या लहान-मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. माजी मंत्री अनंतराव देशमुख यांना अलीकडे भाजपमध्ये आणले गेले. शिंदे गटाच्या खा. भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील ते प्रभावी नेते आहेत.

मतभेद नको, कामाला लागा
भाजपकडे असलेले मतदारसंघ किंवा शिंदेंच्या खासदारांकडे असलेले, असा कोणताही भेद न करता जोरदार तयारीला लागा, असे आदेश ‘महाविजय २०२४’ हे मिशन राबवित असलेल्या पक्षाच्या समितीलाच नव्हेतर, खालपर्यंतच्या यंत्रणेलादेखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आ. श्रीकांत भारतीय यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने नेमलेल्या ‘महाविजय २०२४’ अभियानाचे मुख्य मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. 

Web Title: Even where eknath Shinde group shiv sena MP BJP has started strong preparations elections 2024 lok sabha politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.