अखेर 47 वर्षानंतर मुंबई मनपाला आली जाग
By admin | Published: March 10, 2017 09:15 PM2017-03-10T21:15:16+5:302017-03-10T21:15:16+5:30
बेकायदा बांधकाम पाडण्यात तत्पर असल्याचे चित्र उभे करणाऱ्या महापालिकेला चक्क ४७ वर्षानंतर जाग आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बेकायदा बांधकाम पाडण्यात तत्पर असल्याचे चित्र उभे करणाऱ्या महापालिकेला चक्क ४७ वर्षानंतर जाग आली आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व येथील रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध बांधण्यात आलेली भिंतही काढल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगतीमार्गाला जोडणारा नवा पर्यायदेखील उपलब्ध झाला आहे. नुकत्याच ताब्यात घेतलेल्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. उद्यापासून हा रस्ता नागरिकांसाठी खुला होत आहे.
अंधेरी पूर्व, मांजरेकर वाडी परिसरातील एक ६० फुटी रस्ता आहे. या रस्त्यावर 'सिंधीया सोसायटी'ने अनधिकृत बांधकाम केले होते. यामुळे गेली ४७ वर्षे हा मार्ग बंद होता. सोसायटीने विकास नियोजन आराखड्यात प्रस्तावित रस्त्याच्या एका बाजूला अनधिकृत कम्पाऊंडचे बांधकाम तर दुस-या ठिकाणी सुरक्षा चौकी व प्रवेशद्वार बांधले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नव्हता. विशेष म्हणजे विकास नियोजन आराखड्यातून या रस्त्यासाठी प्राप्त होणाऱ्या चटई क्षेत्राचा फायदा देखील संबंधित सोसायटीने सन १९६९ मध्येच घेतला होता. त्यामुळे या रस्त्याची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास विरोध केला जात होता. तसेच या आसपासच्या इतर सोसायटीमधील नागरिकांनाही या अतिक्रमणांमुळे मोठा वळसा घालून जावे लागत होते.
तब्बल सुमारे पाच दशक येथील नागरिकांची अशाप्रकारे गैरसोय सुरू असताना पालिका प्रशासन झोपले होते. अलीकडे या अतिक्रमणाची दाखल प्रशासनाने घेतली. त्यानुसार अखेर या ठिकाणी कारवाई करून हा रास्ता मोकळा करण्यात आला. यामध्ये विकास नियोजनात प्रस्तावित या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे, प्रवेशद्वार व संरक्षण भिंत तोडण्यात आली. अनधिकृतपणे बळकावलेला रस्त्याचा भाग ताब्यात आल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. गॅसची वाहिनी, विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या व पथदिवे इतरत्र हलवून येथील मार्गावर डांबरीकरण व दुभाजक बसविण्याचे काम करण्यात आले. चार दिवसात हा रास्ता मोकळा करण्यात आला. उद्या हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.
* ना. सी. फडके मार्ग व अंधेरी कुर्ला मार्ग यांना जोडणारा सुमारे दीड कि. मी. लांबीचा आणि १८.३० मीटर म्हणजेच ६० फूट एवढी रुंदी असलेला विकास नियोजन रस्ता हा एका सोसायटीने रस्त्याच्या मधोमध भिंत बांधल्याने आणि रस्त्याचा काही भाग अनधिकृतपणे कब्जात ठेवल्याने गेली ४७ वर्षे बंद होता.
* हा रास्ता खुला केल्याने या परिसरातील जवळपास ४० सोसायटीना त्याचा लाभ होणार आहे. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दोन जेसीबी व पाच डंपर वापरण्यात आले. तसेच महापालिकेचे सुमारे ६० कामगार - कर्मचारी - अधिकाऱ्यांनीही कारवाईत भाग घेतला.