अखेर राज्यात अडीच कोटी सातबारे झाले डिजिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:39 PM2020-01-23T13:39:12+5:302020-01-23T13:44:23+5:30
त्रुटी दूर करुन फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के काम
पुणे : गेल्या पाच-सहा वर्षांपासून राज्यात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरु असून, अखेर ९३ टक्के सातबारे उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाले आहेत. आता राज्यातील २ कोटी ३४ लाख ५६ हजार सातबारे ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध झाले आहे. सध्या केवळ साडे सहा टक्के सातबारे उत्तारे डिजिटल स्वरुपात येणे शिल्लक आहे. या सातबाऱ्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करुन फेब्रुवारीअखेर पर्यंत शंभर टक्के काम सातबारे ऑनलाईन स्वरुपात येणार आहेत.
राज्याचे अपर मुख्य महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सातबारा संगणकीकरण आणि डिजिटल सातबारा उपलब्धी संदर्भात आढावा घेतला. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम, सहआयुक्त लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, राज्य समन्वयक रामदास जगताप उपस्थित होते. सातबारा उतारा यांचे डिजिटलायझेशन झाल्यानंतर अद्यापही साडेसहा टक्के सातबारा उतारा मध्ये त्रुटी आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर आहे. त्रुटी दुरुस्तीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण कार्यवाही करावी अशा सूचना मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
राज्यात दोन कोटी ३४ लाख ६५ हजार सातबारा उतारे डिजिटल साईनयुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्याचा नागरिकांना फायदा होत आहे. सातबारा आणि त्याअनुषंगाने हक्क प्रणाली या सेवा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तसेच त्रुटी मुक्त सातबारा लोकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील महसूल प्रशासनाची आहे, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणारे सातबारा संगणकीकरण दुरुस्ती अर्ज यांचा वेळेत निपटारा करून तोटी दुरूस्ती केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.