अखेर कचरा उचलण्यास सुरुवात
By admin | Published: June 29, 2016 02:15 AM2016-06-29T02:15:02+5:302016-06-29T02:15:02+5:30
वर्गीकरणाच्या सक्तीसाठी कचरा न उचलल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते.
नवी मुंबई : वर्गीकरणाच्या सक्तीसाठी कचरा न उचलल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते. पालिकेच्या मनमानीविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होताच घनकचरा विभागाने सोसायट्यांमध्ये साचलेला कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी ओला - सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र बिन्स पुरविल्या आहेत. परंतु नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे प्रशासनाने वर्गीकरण केले तरच कचरा उचलण्याचा निर्णय घेतला यामुळे चार दिवस सर्व सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले होते. नागरिक व नगरसेवकांनी फोन केल्यानंतरही कचरा उचलला जात नव्हता. कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला होता. ‘लोकमत’ने प्रशासनाच्या मनमानीकडे लक्ष वेधल्यानंतर ठेकेदाराने तत्काळ कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. कचरा उचलल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे नगरसेवक व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. ऐरोलीमध्ये नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. नेरूळमध्ये नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनीही प्रभागात जनजागृती सुरू ठेवली आहे. नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडियाचा वापर नगरसेवक एम. के. मढवी, गिरीश म्हात्रे यांनी जनजागृतीसाठी सुरू केला आहे. ओला - सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. सर्वच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही जनजागृती करण्याची गरज आहे.