अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:05 AM2024-02-27T06:05:11+5:302024-02-27T06:05:52+5:30
ओबीसीतूनच आरक्षण, सगेसोयरे मुद्द्यांवर ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाज बांधवांच्या विनंतीनुसार सोमवारी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले. संचारबंदीमुळे समाज बांधवांना अंतरवाली सराटीत येता येत नाही. त्यामुळे दोन-चार दिवस उपचार घेऊन राज्यातील गावागावांत जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. 'सग्यासोयऱ्यां'ची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
रविवारी रात्री पाच हजार महिला, २५ हजार लोक सोबत होते. त्यांना काहीतरी घडवून आणायचे होते. पोलिस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती, तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता, तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. माझ्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे नाव घेऊन आरोप झाले. परंतु राजकारण आपल्या डोक्यातच नाही. आपल्याला समाजाला आरक्षण द्यायचे आहे. यामुळे अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुम्हाला संधी आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये. तुम्ही चक्रव्यूह रचले होते, परंतु आम्ही डाव उधळून लावला आहे. नवनवीन डाव टाकून नाराजी ओढावून घेऊ नका. या अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. १० टक्के आरक्षण मी स्वीकारू शकत नाही. ओबीसीतूनच आरक्षण हवे, असेही ते म्हणाले.