अखेर खासदारांना आली जाग
By admin | Published: September 24, 2016 03:23 AM2016-09-24T03:23:58+5:302016-09-24T03:23:58+5:30
स्कायवॉकचे काम दोन वर्षाहून अधिक काळापासून रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आतापर्यंत झोपलेले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे जागे झाले
ठाणे : विटावा ते ठाणे या प्रस्तावित स्कायवॉकचे काम दोन वर्षाहून अधिक काळापासून रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आतापर्यंत झोपलेले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे जागे झाले असून त्यांनी बुुधवारी जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांच्यासह कामाची पाहणी केली. यानंतर, या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. वन खात्याची अंतिम मंजुरी मिळून या कामाला येत्या दोन महिन्यांत सुरु वात करण्याच्या दृष्टीने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षकांनी संयुक्त पाहणी करण्याची सूचनाही त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना या वेळी केली.
विटावावासीयांच्या सोयीसाठी विटावा ते ठाणे असा स्कायवॉक प्रस्तावित आहे. मात्र, हे काम प्रदीर्घ काळापासून रखडले आहे. तसेच आता या कामाच्या एमएमआरडीएने २०.५८ लाखांच्या निविदा काढल्याचे वृत्त गुरुवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन खासदार शिंदे यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. दरम्यान, अन्य कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने विटावावासीय सध्या जीव धोक्यात घालून रेल्वेमार्गाच्या बाजूने ठाणे स्थानकाकडे येजा करतात. त्यामुळे या स्कायवॉकच्या कामाला लवकरात लवकर सुरु वात होणे गरजेचे आहे. मात्र, वन खात्याच्या मंजुरीअभावी कामाला सुरु वात झालेली नाही. यामुळे शिंदे यांनी आता याकामी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
>वाहनचालकांसाठीही नवा पूल करणार
या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक होत असताना रेल्वेच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गांच्या बाजूने हलक्या वाहनांसाठीही रेल्वेला समांतर पूल होणे गरजेचे आहे, असे शिंदे या वेळी म्हणाले. तसे झाल्यास विटावावासीयांचा जवळपास ३ किमीचा फेरा वाचणार असून कळवा पुलावरील वाहतुकीचा ताणही त्यामुळे कमी होऊ शकतो. त्यामुळे एमएमआरडीएकडे तशी मागणी करणार असून कोणत्याही परिस्थितीत या पुलाला मंजुरी मिळवू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.