अखेर रस्ता झाला पूर्ववत
By Admin | Published: April 29, 2016 01:57 AM2016-04-29T01:57:06+5:302016-04-29T01:57:06+5:30
रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.
रावेत : वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातील जलवाहिनीसाठी रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन मुख्य चौकातील रस्ता पूर्ववत केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वाल्हेकरवाडी येथील मुख्य शिवाजी चौकात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याकरिता खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे राडारोडा रस्त्यावर तसाच पडून होता. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत होते. नागरिकांना पायी चालणेसुद्धा अवघड झाले होते. भूमिगत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटूनही या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते ठेकेदाराने व्यवस्थित बुजविले नव्हते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता . परिसरातील जलवाहिन्या गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या होत्या. त्या बदलाव्यात, अशी मागणी नागरिकांची होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले. परंतु, या भागातील खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. रस्ते खड्डेमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना तेथून जाताना कसरत करावी लागत होती.
या भागातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच सर्वत्र रस्ते खोदून रस्त्याची चाळण झाली होती. मुख्य चौकातील जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिक करीत होते. (वार्ताहर)