अखेर गाणारांनी बाजी मारली
By admin | Published: February 8, 2017 02:23 AM2017-02-08T02:23:47+5:302017-02-08T05:46:40+5:30
नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी बाजी मारली
नागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी बाजी मारली. गाणार यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर १२०३९ मते मिळवित शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना मागे टाकले. झाडे यांना ७१९९ मते मिळाली. गाणार पहिल्या फेरीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले खरे, पण अधिकृत विजयासाठी गाणार समर्थकांच्या हृदयाचा ठोका वाढला. रात्री १.४५ वाजता आलेल्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत गाणार यांना १२०३९ मतेच पडली होती. त्यांना विजयासाठी १३ हजार ८६० मतांची आवश्यकता आहे. विजयासाठी कोटो पूर्ण झाला नसला तरी सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.
पहिल्या तीन फेरीत पहिल्या पसंतीत त्यांनी १००३२ मते मिळविली होती. परंतु दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांनी चांगलीच माघार घेतली. १३ उमेदवार बाद झाल्यानंतर त्यांना ११३३० मतेच पडली. विशेष म्हणजे गाणार यांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पहिल्या पसंतीच्या मतांवरच गाणार विजयी होतील, असा दावा केला होता. परंतु गाणार यांना विजयासाठी उशीरापर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून विभागीय शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली. २९१७६ मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांसाठी मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत गाणार यांना ४९६०, दुसऱ्या फेरीत ४६३२ व तिसऱ्या फेरीत ४४० मते पडली.