अखेर त्या पुतळ्याची सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:54 PM2021-08-25T19:54:49+5:302021-08-25T19:55:12+5:30
समाजसेवक शशिकांत दायमा यांनी त्या पुतळ्याच्या स्वच्छता बाबत सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील गांधी रोड परिसरातील दुरावस्था झालेल्या पुतळ्याची स्वच्छता सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता सिंधी राजा दहिरसेन यांच्या जयंती निमित्त करण्यात आली. समाजसेवक शशिकांत दायमा यांनी त्या पुतळ्याच्या स्वच्छता बाबत सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.
उल्हासनगर स्थापनेनंतर कॅम्प नं-५ गांधी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासी साम्य असलेला पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याची नोंद महापालिका दफ्तरी नसून पुतळ्याची निश्चित माहिती कोणालाही नाही. गेल्या काही वर्षात पुतळ्याची दुरावस्था झाल्याने, सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्यावर, शिवसेनेसह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यावर पुतळ्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा पुतळ्याची दुरावस्था झाल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. सिंधी समाजातील जुन्या नागरिकांनी पुतळ्याचे साम्य सिंधी राजा दहिरसेन यांच्याशी मिळतेजुळते असल्याने, पुतळा राजा दहिरसेन यांचा असल्याचे बोलले जाते. सिंधी राजा दहिरसेन यांचा पुतळा असेलतर शहरात बहुसंख्यानी असलेल्या सिंधी समाजाने पुतळ्याकडे दुर्लक्ष का केले?. असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारीत आहेत.
महापालिकेकडे शिवसेनेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या दुरुस्ती बाबत पाठपुरावा केला. मात्र महापालिका दफ्तरी पुतळ्याची नोंद नसल्याचे कारण दिल्याने, पुतळ्याची दुरुस्ती रखडली आहे. दुरावस्था झालेला पुतळा पडून नागरिकांच्या भावना दुखू नये म्हणून, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत दायमा यांनी २५ ऑगस्ट रोजी सिंधी राजा दहिरसेन यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्याची स्वच्छता करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी दायमा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बुधवारी सकाळी ११ वाजता पुतळा व परिसराची स्वच्छता केली. तसेच पुतळ्या भोवती पांढरा कापड गुंडाळण्यात आला. महापालिका प्रशासनाने पुतळ्या बाबत लक्ष देऊन पुतळ्याची पुनर्बांधणी करावी. असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.