दर साडेदहा मिनिटांना देशात एकास सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:13 AM2018-07-24T00:13:17+5:302018-07-24T00:15:07+5:30
राज्यात सर्वाधिक प्रमाण; आरोग्य व्यवस्थापन प्रणालीचा अहवाल
मुंबई : देशात सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर महिन्यांत राज्यात ३३ हजार ६७३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर देशात १ लाख ६१ हजार ४७८ सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४-१५ साली ३८ हजार ५१४, २०१५-१६ साली ३९ हजार १०३, २०१६-१७ साली ३६ हजार ६० सर्पदंशाच्या घटना घडल्या. देशात दर साडेदहा मिनिटाला एका व्यक्तीला सर्पदंश होतो, असे भारत सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशीगंधा नाईक यांनी या संदर्भात सांगितले की, देशात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, त्यावर तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. देशात एड्स आजाराने सर्वांत जास्त बळी जातात. त्यानंतर, सर्पदंश होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकार एड्सवर उपाययोजना, जागृती करते. मात्र, सर्पदंशाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती जास्त प्रमाणात होताना दिसून येत नाही. सर्पदंशाच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.