रोज एका पालकाला शाळेत पाहुणचार!
By admin | Published: November 24, 2015 02:54 AM2015-11-24T02:54:45+5:302015-11-24T02:54:45+5:30
शालेय पोषण आहाराचा शिक्षक कितीही त्रागा करीत असले, तरी शाळेच्या मुदपाकखान्यातून त्यांची सुटका होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
अविनाश साबापुरे, यवतमाळ
शालेय पोषण आहाराचा शिक्षक कितीही त्रागा करीत असले, तरी शाळेच्या मुदपाकखान्यातून त्यांची सुटका होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. आहाराचा दर्जा तपासण्यासाठी आता अजब निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. तो म्हणजे, दररोज एका पालकाला शाळेत पाहुणचार देण्याचा! येत्या १ डिसेंबरपासून या ‘पाहुणचारा’ची सुरुवात करण्याचे आदेश आहेत.
या निर्णयानुसार, शालेय पोषण आहार वाटपावेळी प्रत्येक शाळेमध्ये दररोज एक पालक उपस्थित राहून जेवण घेणार आहे. नुसता जेवणच घेणार नाही, तर जेवण कसे होते? धान्याचा दर्जा कसा होता? अन्न चविष्ट होते का? शासनाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना आहार दिला गेला का? याचीही तो पडताळणी करेल. जेवण झाल्या-झाल्या तो पोषण आहाराच्या दर्जाविषयी लगेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना एसएमएस पाठवेल. अशा सर्व शाळांतून दररोज येणाऱ्या एसएमएसचा गटशिक्षणाधिकारी संग्रह करतील.
पंचायत समित्या सर्व एसएमएसचा एकत्रित साप्ताहिक अहवाल तयार करतील. ज्या शाळेतील पोषण आहाराबाबत तक्रार असेल, अशा शाळांचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवतील. त्यानुसार संबधित शाळेतील मालाची देयके अदा करण्यात येऊ नयेत, अशा सूचना शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळल्याने अमरावती जिल्ह्याच्या सेमाडोह येथील शिक्षकाने नुकतीच कारवाईच्या भीतीने आत्महत्या केली. या घटनेने राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप पसरलेला असताना पोषण आहाराच्या दर्जावर पालकांकडून ‘वॉच’ ठेवण्याचा आदेश काढून, संचालनालयाने शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा शब्दांत शिक्षकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
शाळास्तरावर निधी
तालुक्यात जेथे शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत असेल, त्या शाळेला धान्यादी मालाचा निधी शाळास्तरावरच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एका शाळेत हा प्रकार प्रायोगिक तत्त्वावर करावयाचा आहे. सहा महिन्यांनंतर या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून आढावा घेण्यात येणार आहे