मुंबईतून दर आठ तासाला होतेय वाहनचोरी...
By Admin | Published: May 11, 2017 02:27 AM2017-05-11T02:27:02+5:302017-05-11T02:27:02+5:30
दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईतून तब्बल ८८७ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी अवघ्या २१० वाहनांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
देशाची आर्थिक राजधानीतील चोर-पोलिसांचा खेळ पोलिसांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीसोबतच धूमस्टाईलने सोनसाखळीच्या चोऱ्या करण्याचे प्रमाण काही वर्षापूर्वी मुंबईत प्रचंड वाढले होते. निव्वळ सोनसाखळी चोरीच्या दिवसाला सरासरी पाच ते सहा, तर वर्षाकाठी सुमारे दीड हजार गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रस्त्यावरील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या. त्यानंतर, सोनसाखळीसारखे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसली.
सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली, तरी मोटारवाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात मोटारवाहन चोरीचे ३ हजार ११८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलींचे प्रमाण अवघे २५ ते २८ टक्के आहे. त्यात या वर्षी १ जानेवारी ते २३ एप्रिल २०१७ पर्यंत वाहनचोरीचे तब्बल ८८७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर आठ तासाला वाहनचोरी होत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनचोरीच्या नानाविध प्रयत्नांमुळे चालकांप्रमाणे पोलिसांची डोकेदुखी वाढते आहे. त्यामुळे या चोरांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.